Akbaruddin Owaisi Speech: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचालय. वाशिमच्या सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे,कटेंगेचं वक्तव्य करून हिंदूना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे अकबरुद्दीन ओवीसींनी 15 मिनिटांचा उल्लेख करत मुस्लिमांना एकत्र येण्याचं आव्हान केलंय. आता महाराष्ट्राच्या प्रचारात बटेंगे कटेंगे आणि 15 मिनिटांच्या इशाऱ्याची जोरदार चर्चा होतेय.
अकबरुद्दीन ओवैसींनी बारा वर्षांपूर्वी केलेल्या चिथावणीखोर भाषणानं मोठा वाद निर्माण झाला होता. याबाबत त्यांना जेलवारीही करावी लागली होती. तरीही अकबरुद्दीन ओवैसींच्या भाषेत आणि भाषणातला विखारीपणा कमी झालेला नाही. संभाजीनगरच्या प्रचारसभेत त्यांनी पुन्हा चिथावणीखोर वक्तव्य केलंय. प्रचारसभा सुरू असताना 9.45 मिनिटांनी अजून 15 मिनिट बाकी आहेत,अशी गर्भीत धमकी अकबरुद्दीन ओवैसींनी दिलीय.
अकबरूद्दीन ओवैसी यांच्या 15 मिनिटाच्या इशा-यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागात अज्ञात व्यक्तीकडून होर्डिंग लावण्यात आलंय. या होर्डिंगवर पंधरा मिनिटांचं एकच उत्तर शंभर टक्के मतदान, असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे संभाजीनगरचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. भाजप नेते आणि संभाजीनगरचे उमेदवार अतुल सावेंनी या होर्डिंग्जबाबत कानावर हात ठेवलेत. संभाजीनगरच्या कोणत्याही निवडणुकीत हिंदू-मुसलमान,औरंगजेब हा मुद्दा आल्याशिवाय ती निवडणूकच पूर्ण होत नाही. यावेळीही विकासाच्य़ा मुद्दयानं निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आणि प्रचार धार्मिक ध्रुवीकरणावर येऊन ठेपलाय. त्यात अकबरुद्दीन ओवैसींनी आपल्या भडक वक्तव्यानं संभाजीनगरमधील वातावरण तापलंय.
11 वर्षांपूर्वी अकबरुद्धीन ओवेसी यांनी हिंदूंचा उल्लेख करत जर पोलिसांना 15 मिनिटं हटवा असं आव्हान दिलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद झाला होता. आता नवनीत राणा यांनी त्यांना आव्हान देत जुना वाद नव्याने समोर आणला आहे. नवनीत राणा हैदराबामध्ये भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी पोहोचल्या होत्या. या मतदारसंघात असदुद्दीन ओवेसी यांचं वर्चस्व आहे.
"छोटा भाऊ म्हणतो की पोलिसांना 15 मिनिटं हटवा आम्ही काय करु शकतो हे दाखवून देतो. त्याला मला सांगायचं आहे की, तुला 15 मिनिटं लागतील पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील. 15 सेकंदानंतर छोट्याला कुठून आलो आणि कुठे गेलो हे समजणार नाही," असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे. तसंच माधवी लता हैदराबादला पाकिस्तानात रुपांतरित होण्यापासून रोखतील असंही सांगितलं. "जर तुम्ही एमआयएम आणि काँग्रेसला मत दिले तर ते थेट पाकिस्तानात जातं. पाकिस्तान ज्याप्रकारे 'एमआयएम प्रेम' आणि 'राहुलप्रेम' दाखवत आहे... ज्याप्रकारे काँग्रेसने पाकिस्तानच्या इशाऱ्यावर देशाचा कारभार चालवला... तोच पाक आज म्हणतोय की त्यांना काँग्रेस आणि एमआयएम आवडतात," असं नवनीत राणा म्हणाल्या.
नवनीत राणा यांच्या विधानावर असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर दिलं आहे. "मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगत आहे की, त्यांना 15 सेकंद द्या. त्या काय करणार आहेत? त्यांना 15 सेकंद नको तर 1 तास द्या. त्या काय करु शकतात हे आम्हालाही पाहायचं आहे. त्यांच्यात काही माणुसकी उरली आहे का? कोण घाबरलं आहे? आम्ही तयार आहोत. जर कोणी असं जाहीर आव्हान देत असेल तर देऊ देत. कोण त्यांना थांबवत आहे?".