Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातल राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या पक्षफोडीचं राजकारण वेग धरत असतानाच उमेदवारीसाठी नेतेमंडळी आणि काही मोठे चेहरेच प्रस्थापितांचे पक्ष सोडत जिथं उमेदवारीची संधी आहे अशा पक्षांची साथ घेताना दिसत आहेत. किंबहुना अनेकांनी नवी सुरुवात करत निवडणुकीआधी पक्षप्रवेशही केले आहेत. तिथं कोकणात निलेश राणे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केला असतानाच इथं महायुतीत आणखी एका पक्षांतराच्या चर्चेनं जोर धरला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार महायुती मध्ये पुन्हा कोकण पॅटर्न लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघासाठी जोरदार रस्सी खेच सुरु असल्यामुळं (BJP) भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी रात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. महाडिक यांनी आपले पुत्र कृष्णराज महाडिकला उमेदवारी मिळवून देण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा (Kolhapur North) शिवसेनेचा (Shivsena)असल्यामुळं आता ती जागा मुलगा कृष्णराज महाडिक याला मिळावी म्हणून खासदार धनंजय महाडिकांनी (MP Dhananjay Mahadik) चांगलीच तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर कृष्णराज महाडिक हातात शिवधनुष्य घेण्याची शक्यता आहे. अर्थात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत कृष्णराज यांचा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कृष्णराजच्या प्रवेशास ग्रीन सिग्नल दिल्यामुळं आता शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत या नावाचा समावेश होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
कृष्णराज महाडिक हा खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा. कोल्हापुरात कृष्णराज बराच प्रसिद्ध असून, तो स्थानिकांच्या प्रश्नांपासून युवा वर्गासाठी अनेक उपक्रमांचं आयोजन करताना दिसतो. युट्यूबच्या माध्यातूनही कृष्णराज व्लॉगिंग करत बराच प्रकाशझोतात आला आहे. इथं तो Daily Vlogs सोबतच जनसेवाहितार्थ करत असलेल्या कामांचे व्हिडीओ, राजकीय भेटीगाठी यासंदर्भातील माहिती देताना दिसतो. कृष्णराजची आणखी एक ओळख म्हणजे, त्यानं ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. 7 वर्षांपूर्वी तब्बल 19 वर्षांनंतर एखाद्या भारतीयानं ही किमया केली होती.