'मी आमदार झालो तर तुमची लग्नं लावून देईन'; पवारांच्या उमेदवाराचं आश्वासन! म्हणाला, 'इथे एकही...'

Maharashtra Assembly Election: रस्ते, पाणी, नागरी सुविधा यासारख्या आश्वासनांबद्दल तुम्ही यापूर्वी नक्कीच ऐकलं असेल मात्र सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एका उमेदवाराने चक्क तरुणांना लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2024, 10:19 AM IST
'मी आमदार झालो तर तुमची लग्नं लावून देईन'; पवारांच्या उमेदवाराचं आश्वासन! म्हणाला, 'इथे एकही...' title=
स्थानिकांशी बोलताना केलं विधान (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Maharashtra Assembly Election:  महाराष्ट्रातील दुष्काळी भागामध्ये अनेक लग्नाळू मुलं अविवाहित असल्याच्या बातम्या यापूर्वी तुम्ही अनेकदा वाचल्या आणि पाहिल्या असतील. अनेकदा ग्रामीण भागात रोजगार नसल्यानेही मुलांची लग्न होत नसल्याची, त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. लग्न होत नसल्याने वैतागलेल्या अशा लग्नाळू अविवाहित तरुणांकडून बऱ्याचदा  विवाहासंदर्भात केल्या जाणाऱ्या मागण्या चर्चेत असतात. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. यासाठी कारण ठरलं आहे परळी मतदारसंघातील एका उमेदवाराने केलेलं विधान!

प्रचाराचा शुभारंभ करतानाच आश्वासन

परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचाराला सुरुवात करतानाच दिलेलं एक आश्वासन चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी एक अजब आश्वासन दिले आहे. परळी मतदारसंघातील घाटनांदुर येथे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत देशमुख यांनी आपल्या जाहीर भाषणात, "उद्याच्या काळात मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करुन देऊ," असे विधान केले. सध्या देशमुख यांच्या या विधानाची जोरदार चर्चा आता जिल्ह्यात होत आहेय

नेमकं काय म्हणाले देशमुख?

राजेसाहेब देशमुख यांनी मुलांचं लग्न लावून देण्यासंदर्भातील सविस्तर भूमिका मांडली. "परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून (लग्नाचं स्थळ) येत असताना विचारतात नोकरी आहे का? काही कामधंदा आहे का? पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही, तुमचा कुठून येणार? इथे एकही उद्योगधंदा उभा केला नाही. त्यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे. पण सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो. जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करुन देईन. सगळ्या पोरांना कामधंदा देऊ," असं देशमुख म्हणाले. "अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी तरुणांची लग्नं करायची आहेत. त्यामुळे 'आगे बढो' म्हणल्याशिवाय पर्याय नाही," राजेसाहेब देशमुखांनी म्हटलं असून त्यांच्या या अजब आश्वासनाची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

नक्की वाचा >> 'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

इथे लढत कशी?

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तसेच मंत्री धनंजय मुंडेंविरुद्ध राजेसाहेब देशमुख निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने या ठिकाणी काय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. शरद पवार या मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी काय खेळी करणार आणि त्याला मुंडे भाऊ-बहीण कसं उत्तर देणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.