Mahayuti Seat allocation: महायुतीनं जागा वाटपात आघाडी घेतली असली तरीही अनेक जागांवर अजूनही पेच कायम आहे. जवळपास डझनभर जागांवर अजूनही महायुतीत एकमत झालेलं नाही. या जागा मिळवण्यासाठी महायुतीमध्ये धुमश्चक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस असताना महायुतीत कोणत्या जागांवर पेच कायम आहे? जाणून घेऊया.विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारखा घोळ न करता यावेळी महायुतीनं जागावाटपांमध्ये आघाडी घेतलीय. जागावाटपाबाबत महायुतीतले नेते एकवाक्यता दाखवल असले तरीही काही जागांवर अंतर्गत धुसफूस दिसून येतेय. मुंबईसह अनेक जागांवर महायुतीत पेच निर्माण झालेला दिसून येतोय
मुंबईतल्या कलिनाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.शिवसेनेकडून माजी नगरसेवक कमलेश राय आणि भाजपचे माजी आमदार अमरजित सिंग आणि अखिलेश तिवारी इच्छुक आहेत. चेंबूरमध्ये शिवसेनेकडून तुकाराम काते यांनी दावा केलाय. तर भाजपकडून राहुल वाळंज आणि महादेव देवळे यांनी दावा केलाय. वरळीत शिवसेना आणि भाजपनं दावा केलाय. शिवसेनेकडून दत्ता नरवणकर आणि भाजपकडून शायना एनसी यांची नावं चर्चेत आहेत. शिवडी मतदारसंघात भाजपचे गोपाळ दळवी इच्छुक आहेत तर शिवसेनेची मदार आयात उमेदवारावर आहे. धारावीत शिवसेनेने दावा केलाय. मात्र, गेल्या वेळस भाजपनं ही जागा लढवली असल्यानं भाजपचाही या जागेवर दावा आहेभाजपकडून दिव्या ढोले तर शिवसेनेकडून राहुल शेवाळे इच्छुक आहेत.वर्सोवा मतदारसंघावर भाजप आणि शिवसेनेनं दावा केलाय. भाजपातून संतोष पांडेय, भारती लव्हेकर इच्छुक आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून उमेदवार आयात करून एकनाथ शिंदे उमेदवार देऊ शकतातमिरा भाईंदरमध्ये शिवसेनेकडून गीता जैन आणि भाजपचे नरेंद्र महेता इच्छुक आहेत.
मुंबईतल्या जागांसोबतच उत्तर महाराष्ट्रातील दिंडोशी, अक्कलकुवा या जागांवरही भाजप आणि शिवसेनेकडून दावा करण्यात येतो. तर बीड जिलल्ह्यातील आष्टी,गेवराई या मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादीनं दावा केलाय. तर करमाळा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे उत्सुक आहेत तर भाजपनं देखील या जागेवर दावा केलाय. एकंदरीत महायुतीतले मित्रपत्र आता हा तिढा कसा सोडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जागावाटप जाहीर करण्यात येत आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र लढतेय. यासोबतच आरपीआय, रासप यांच्यासह इतर पक्षही महायुतीसोबत आहेत. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 4 ते 5 जागा हव्या आहेत. केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले जागा वाटपावरुन नाराज आहेत. त्यांनी नुकतीच सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आता ते मुख्यमंत्र्यांसोबतदेखील चर्चा करणार आहेत. मी आणि माझ्या पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. आमचा पक्ष छोटा जरी असला तरी आम्हाला महायुतीत जागा हव्या आहेत. यासंदर्भात मागे मी फडणविसांनी पत्र दिले होते. किमान 5 जागा आरपीआयला द्या, अशी मागणी मी केल्याचे त्यांनी सांगितले.