Maharashtra Assembly Election Mahim Constituency: राज्यातील विधानसभा निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून शेवटच्या काही तासांमध्ये अनेक बंडखोरांबरोबरच मोठ्या प्रमाणात अपक्षांनाही अर्ज दाखल केले आहेत. असं असतानाच मुंबईमधील सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या महीममधून सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोध झुगारुन अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळेच या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं माघार घ्यावी अशी चर्चा सुरु होती. यासंदर्भात भारतीय जनता पार्टीबरोबरच स्वत: मुख्यमंत्री शिंदेंही सकारात्मक होतो. मात्र मागील अनेक दशकांपासून मुंबईतील या मतदारसंघात निवडून आलेले विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला. काहीही झालं तरी आपण उमेदवारी अर्ज भरणारच असं सरवणकर यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळाल्याने याच पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.
मागील अनेक वर्षांपासून माहीम-दादर मतदारसंघामध्ये सदा सरवणकर निवडून येत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदेंच्या पक्षात सहभागी झाले. त्यांना या निवडणुकीसाठी शिंदेंनी उमेदवारी जाहीर करुन एबी फॉर्मही दिला. मात्र त्यानंतर याच मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरेंनी भाजपाच्या उमेदवारांसाठी कोकण, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यात सभाही घेतल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेंची शिवसेना आणि मनसेमध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. अनेकदा शिंदे आणि राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या कारणांसाठी भेटीगाठी मागील अडीच वर्षात झाल्याचं दिसून आलं. लोकसभेला दिलेल्या बिनशर्थ पाठींब्याच्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेला शिंदेंच्या पक्षाने उमेदवार मागे घेत अमित ठाकरेंना विजय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं अशी मनसेचं म्हणणं असल्याच्या बातम्या समोर आल्या.
यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि मनसेचे नेते राज ठाकरेंदरम्यान चर्चा झाल्याच्या बातम्याही सूत्रांच्या हवाल्याने आल्या. त्यानंतर मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचा सूचक सल्ला देत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी सदा सरवणकरांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळेस सरवणकरांनी समर्थकांना संबोधित करत आपल्याला मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढण्यास सांगितलं असल्याचा दावा केला.
नक्की वाचा >> 'सदा सरवणकर माघार घेणार?' ऐकताच अमित ठाकरे हात जोडून म्हणाले, 'मी माझ्या...'
मात्र रविवार दिवसभर उमेदवारीवरुन चर्चांना उधाण आलेलं असतानाच रविवारी रात्री अनाचक सरवणकरांना मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावरुन बोलवणं आलं. तिथे मुख्यमंत्र्यांबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर त्यांची कथित चर्चा झाली. त्यामध्ये सरवणकरांना मुख्यमंत्र्यांनी 24 तासात काय तो निर्णय घ्या असा सूचक इशारा दिला. त्यानंतर सरवणकर तिथून निघाले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास ते पुन्हा 'वर्षा'वर दाखल झाले. त्यांनी अवघ्या 10 मिनिटांच्या भेटीत आपली भूमिका मांडत आपण निवडणूक लढणारच असं शिंदेंना सांगितलं.
त्यानंतर सोमवारी सरवणकर अर्ज भरतील अशी चर्चा होती. मात्र त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून अर्ज शेवटच्या दिवशी म्हणजेच 29 तारखेला भरणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळेच आज सकाळपासूनच 'सामना'च्या कार्यालयाजवळ सरवणकरांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. सर्व कार्यकर्ते तीन तास 'सामना' कार्यालयाजवळच्या शाखेसमोर ताटकळत बसले होते. मात्र सदा सरवणकर रॅलीत न येता थेट अर्ज भरायला गेले. अर्ज भरण्याआधी शक्तीप्रदर्शन न करता अर्ज भरुन झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले.
निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव आहे. मात्र मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं सदा सरवणकरांनी सोमवारी सांगितलं होतं. "मुख्यमंत्र्यांनी एबी फॉर्म दिलाय. त्यांनी माघारीसंदर्भात मला काही सांगितले नाही. राज ठाकरे पुत्रप्रेमासाठी हे सर्व करतायत," असं सदा सरवणकर म्हणाले होते.
नक्की वाचा >> शिंदेंबरोबरच्या Adjustment मुळे BJP हक्काचा मतदारसंघ गमावणार? बड्या नेत्याची बंडखोरी; 3 मतदारसंघात फटका
सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे. मात्र या दरम्यान काही वाटाघाटी झाल्या आणि मुख्यमंत्री शिंदेंनी अधिकृत उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली तरी सरवणकर ही निवडणूक लढू शकतात अशी तजवीज त्यांनी अर्ज भरतानाच करुन ठेवली आहे. अर्ज भरताना सरवणकर यांनी एक अर्ज एबी फॉर्मबरोबरच म्हणजेच मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षाकडून भरला आहे. अन्य एक अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे. त्यामुळे उद्या पक्षाच्या दबावामुळे अर्ज मागे घ्यावा लागला तरी ते अपक्ष लढू शकतात, असं सध्या म्हणता येईल. त्यामुळेच शिंदेंनी पाठिंबा काढला, महायुतीमधील पक्ष विरोधात गेले तरी सरवणकर हे स्वत: एकट्याच्या जीवावर अपक्ष निवडणूक लढू शकतात.
नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'
या ठिकाणी सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंबरोबरच उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्याने तिहेरी लढत होणार आहे.