Maharashtra Assembly Election Baramati Constituency 2024 Result: महाराष्ट्रातील विधानभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे काही तास उरले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी महायुती आणि विरोधक असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या सभा आणि रोड शो होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनी 'झी 24 तास'ला 'टू द पॉईंट' कार्यक्रमामध्ये विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अनेक विषयांवर भाष्य करतानाच संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघासंदर्भात भाकित व्यक्त केलं आहे. अगदी मोजक्या शब्दांमध्ये पवारांनी बारामतीमधील निकालाबद्दल सूचक विधान केलं आहे.
बारामतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाकडून स्वत: अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर त्यांच्याविरोधात शरद पवारांनी युगेंद्र पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शरद पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र असलेले युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत. त्यामुळेच या मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीप्रमाणेच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच अजित पवार मागील काही आठवड्यांमध्ये प्रचारासाठी अनेकदा बारामती मतदारसंघात येणाऱ्या अगदी 50 गावांना भेटी देऊन आल्याचं पाहायला मिळालं आहे. दुसरीकडे युगेंद्र पवारांचाही जोरदार प्रचार या भागात सुरु आहे. या मतदारसंघात काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
'झी 24 तास'ला 'टू द पॉईंट' कार्यक्रमामध्ये शरद पवारांना बारामतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी, "माझी बारामतीमध्ये आज पहिली सभा आहे. मी बारामतीमध्ये आलोच नाही. नागपूर, कोल्हापूरमध्ये जाऊन आलो. आज पहिल्यांदा इथे सभा होणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराचा दौरा या ठिकाणी होत आहे. ठिक आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये असेच चित्र होतं, काही वेगळं चित्र नव्हतं. बारामतीकर योग्य निर्णय घेतात. नेत्यांचा राग माझ्यावर काढू नका असं त्यांनी सांगितल्याचं ऐकलं. आम्ही पक्ष एका विचारधारानेनुसार कामं करतो. एका विचारधारेला धरुन लोकांनी मतदान केलं. ज्या विचारसणीविरोधात मतं मागितली त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं आपला पक्ष त्यांच्याकडे सुपूर्द करणं याचं अर्थ काय? हे सोडलं नाही तर काय झालं? सोडलं म्हणजे काय विचार सोडणं असं म्हणणं आहे," असं शरद पवारांनी म्हटलं.
नक्की वाचा >> राज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! 4 शब्दांत उत्तर
बारामतीमधील निकालासंदर्भात भाष्य करताना शरद पवारांनी, "बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे निकाल लागेल," असा विश्वास व्यक्त केला. तसेच नंतर शरद पवारांनी, "बारामतीकरांच्या शहाणपणावर माझा विश्वास आहे," असंही म्हटलं. शरद पवारांनी केलेलं हे विधान अजित पवारांची धाकधूक वाढवणारं असल्याचं बोललं जात आहे.