दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एकीकडे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाची भीती असतानाच राज्यातल्या जनतेसाठी खुशखबर आहे. राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण तसंच मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या अदानी, टाटा आणि बेस्ट या सगळ्या कंपन्यांच्या वीज दरात पुढच्या ५ वर्षांसाठी कपात होणार आहे. वीज दरात कपात करण्याचे आदेशस राज्य वीज नियामक आयोगाने दिले आहेत. वीज कायद्यानुसार वीजेचे दर ठरवण्याचा अधिकार राज्य वीज नियामक आयोगाला आहे.
आयोगाने जी दर कपात जाहीर केली आहे, त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या संवर्गासाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात सुचवली आहे. त्यानुसार महावितरणचे घरगुती वीज दर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर महाराष्ट्राच्या उद्योगासाठीच्या वीज दरात १० ते १२ टक्क्यांनी कपात होणार आहे. शेतीसाठीचे दर १ टक्क्यांनी कमी होतील.
मुंबईमध्ये बेस्टचे घरगुती वीजेचे दर १ ते २ टक्क्यांनी कमी होणार आहेत. उद्योगासाठीचे वीज दर ७ ते ८ टक्क्यांनी आणि व्यवसायासाठीचे वीज दर ८ ते ९ टक्क्यांनी कमी होतील. मुंबईमधल्या टाटा आणि अदानी कंपन्यांचे वीज दरही कमी होणार आहेत. घरगुती वापराचे वीजेचे दर १० ते ११ टक्क्यांनी तर कंपन्यांचे उद्योगासाठीचे वीज दर १८ ते २० टक्क्यांनी, व्यवसायासाठीचे दर १९ ते २० टक्क्यांनी कमी होतील.