Heat Wave : यंदा ऊन जरा जास्तच आहे. उन्हाच्या काहिलीनं सारं राज्य अक्षरश: भाजून निघालंय. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिलच्या सुरूवातीलाच राज्यात उष्माघातानं (Heat Stroke) दोन जणांचा बळी घेतलाय. जळगावमध्ये (Jalgaon) एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर आता हिंगोलीत उष्माघातामुळे 5 वर्षांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागलाय. नंदिनी खंदारे असं या चिमुकलीचं नाव आहे, तिला उलटी, जुलाब आणि तापाचा त्रास असल्यानं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच तिचा मृत्यू झाला.
तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात शेतमजुराचा शेतात काम करताना उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा इथल्या प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण हा शेतमजूर शेतात काम करत असताना उन्हामुळे त्याला चक्कर आल्याने तो शेतात खाली कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रेमसिंग हा शेतीमजुरीचे काम आणि जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.
पाच जिल्ह्यात तापमान चाळीशी पार
राज्यात ठाणे, पुणे, जळगाव, चंद्रपूर आणि वर्धा इथं 40 अंशाच्यावर तापमान नोंदवले गेलंय. एप्रिल महिन्यातच वर्ध्यातलं तापमान 40 अंशाच्या वर पोहोचलंय. उकरड्याने नागरिक हैराण झालेत. घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, उष्माघातापासून बचावासाठी उपाय करावेत असं आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.
उष्माघाताचे बळी
गेल्या पाच वर्षातली आकडेवारी पाहिली तर 2022 मध्ये उष्माघातानं राज्यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. 2020 आणि 21 मध्ये ही आकडेवारी शून्य होती. तर 2019 मध्ये 9 आणि 2018 मध्ये दोघांना जीव गमवावा लागला.
उष्माघाताची लक्षणं
उष्माघात झालेल्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान अनियंत्रित होतं. शरीराचं तापमान वाढल्यानंतरही घाम येत नाही. सतत मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात. त्वचेवर लाल खुणा, पुरळ दिसू शकतात. हृदयाचे ठोके जलद होतात. डोकेदुखी कायम राहते. मानसिक स्थिती बिघडू लागते. वेळीच उपचार न केल्यास मृत्यूही होऊ शकतो.
उष्म्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. सकाळी 8 वाजल्यापासून सूर्यनारायण कोपल्यासारखी स्थिती दिसून येतीय. त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे.
उष्णता वाढली, आरोग्य जपा
कष्टाची, घराबाहेरची कामं सकाळी किंवा संध्याकाळीच करा. घराबाहेर पडल्यावर सतत पाणी प्या. लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचे सेवन करा. चेहरा सुती कपड्यानं झाका. सैल आणि सुती कपडे वापरा. उघड्यावरचे, तळलेले पदार्थ खाऊ नका. कूलर, एसीतून थेट उन्हात जाऊ नका. यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्यानं चाळिशी पार केलाय. अस्वस्थ करणारं ऊन आणि घामाच्या धारांनी सारेच जण बेजार झालेत. पुढच्या काही दिवसात सूर्यनारायण आणखी कोपलेला असेल. त्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.