श्रीवर्धनमध्ये 'पॉवर'बाज खेळी? शरद पवारांची तटकरेंविरोधात तटबंदी

Maharahstra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे. त्यामुळे एकमेकांच्या उमेदवारांना घेरण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार रणनिती आखली जात आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 18, 2024, 09:22 PM IST
श्रीवर्धनमध्ये 'पॉवर'बाज खेळी? शरद पवारांची तटकरेंविरोधात तटबंदी title=

सीमा आढेसह प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : राज्यात गेल्या पाच वर्षात प्रचंड राजकीय उलथापालथ झालीये.. यामध्ये रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघ (Shrivardhan Constituency) देखील चर्चेत राहिला. या मतदारसंघामध्ये सध्या आदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) या विद्यमान आमदार आहेत. तसेच त्या महायुतीच्या सरकारमध्ये (Mahayuti Government) महिला व बाल विकास मंत्री देखील आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून तटकरेंविरोधात शरद पवारांनीही (Sharad Pawar) चांगलेच दंड थोपटलेत. त्यामुळे आदिती तटकरेंसाठी यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच आव्हानात्मक होणार आहे.. 

शरद पवारांची तटकरेंविरोधात तटबंदी
रायगडमधील राजकारणातील सर्वात मोठं नाव म्हणजे सुनील तटकरे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शरद पवारांकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे या श्रीवर्धन मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे शरद पवारही या मतदारसंघातून आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. 

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. 2009 मध्ये सुनील तटकरेंनी श्रीवर्धन मतदारसंघात विजय मिळवत सुरुंग लावला. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रवादीचे अवधुत तटकरे यांनी विजय मिळवला.  2019 मध्ये आदिती तटकरेंनी शिवसेनेचे विनोद घोसाळकरांचा पराभव करत बाजी मारली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आदिती तटकरे या अजित पवारांसोबत गेल्या. महायुती सरकारमध्ये आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण विकास मंत्रीपद सोपवण्यात आलं.

महाविकास आघाडीमध्ये श्रीवर्धन हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येणार आहे.. मागील काही दिवसांपासून शरद पवारांकडून उमेदवाराचा शोध सुरू होता. त्यात शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे तुतारी हाती घेणार आहेत त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना होण्याची शक्यता आहे..

कोण आहेत ज्ञानदेव पवार? 
 ज्ञानदेव पवार हे माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आहेत. ज्ञानदेव पवार रायगड जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापती सुद्धा होते. 2019 मध्ये श्रीवर्धनमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आता श्रीवर्धनमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ज्ञानदेव पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे 2024 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

सध्या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी श्रीवर्धन हा मतदारसंघ सोपा मानला जात असला तरी बदलती राजकीय समीकरणे पाहता आणि मतांचे होणारे ध्रुवीकरण पाहता येणारी निवडणूक आदिती तटकरेंसाठी आव्हानात्मक असणार यात शंका नाही.