Maharashtra Politics : शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राज्यात आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर शरद पवार मोठं पाऊल उलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्ष काँगेसमध्ये विलीन होऊ शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र शरद पवार गटाकडून याविषयी कोणताही दुजोरा दिलेला नाही. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वाची बैठक सुरू असून त्यात याबाबत चर्चा सुरु असल्याचे म्हटलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांची पक्षाच्या सर्व खासदारांसोबत ही पहिलीच बैठक आहे. खासदार श्रीनिवास पाटील,खासदार सुप्रिया सुळे,खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे, अशोक पवार, आमदार शशिकांत शिंदे, अनिल देशमुख या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा होणार असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे.
शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र याबाबत शरद पवार गटाकडून कोणाताही दुजोरा मिळालेला नाही. पुण्यामध्ये शरद पवार गटाची मोठी बैठक सुरु आहे. या बैठकीला पक्षाचे आमदार खासदार उपस्थित होते.
ही बैठक मोदी बागेत सुरु आहे. शरद पवार गटासोबत असणारे खासदार आणि आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी एका बड्या उद्योगपतीसोबत त्यांची बैठक झाली होती. त्यानंतर आता राज्यसभा आणि लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे शरद पवार गटाला घराघरापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
ही बातमी चुकीची - प्रशांत जगताप
'24 तारखेला पुण्यात मेळवा होणार आहे. पक्ष कुठल्या पक्षात विलीन होणार अशा बातम्या चुकीच्या आहेत. शरद पवार यांच्या नावाचं भय वाटत आहे म्हणून या बातम्या पेरल्या जातात,' अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
शरद पवारांची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.