Maharashtra Rain : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली. तर, काही भागांवर काळ्या ढगांची चादर पाहायला मिळाली. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंगादानुसार येत्या 48 तासांमध्येसुद्धा राज्यात पावसाचं प्रमाण काही भागांमध्ये वाढणार आहे. मुंबई, कोकण आणि गोवा किनारपट्टी भागामध्ये पावसाची समाधानकारक हजेरी असेल. तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येहीह पावसाच्या सरी कोसळताना दिसतील.
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं कोकणापासून गोव्यापर्यंत पावसाची हजेरी पायाला मिळणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर भागामध्ये घाटमाथ्यावर धुकं दाटून येईल. तर, काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी बरसतील. अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या सरींमुळं वातावरणात गारवा जाणवेल. तिथं मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येसुद्धा पावसाची ये-जा सुरुच असेल. असं असताना आता राज्याच्या बहुतांश भागांमधून पाऊस लवकरच काढता पाय घेण्याचीही चिन्हं नाकारता येत नाहीत.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सप्टेंबरपासूनच देशाच्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागातून पावसानं परतीचा प्रवास सुरु केला. तर, ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून पाऊस माघार घ्यायला सुरुवात करेल. असं असलं तरीही परतीच्या पावसापूर्वी राज्यात मान्सून शेवटच्या टप्प्यात जोर धरताना दिसेल. तर, 10 ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्यानं परतीचा प्रवास सुरु होऊनही पावसाच्या सरींची अधूनमधून बरसात होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
इथं परतीच्या पावसाची वाटचाल आता दृष्टीक्षेपात असतानाच तिथं देशातील उत्तरेकडे तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच काय तर, मुंबईत सकाळच्या वेळी तापमानाचा आकडा मोठा असला तरीही रात्रीच्या तापमानात घट होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागत असून, रात्रीचं तापामन २० अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे, तर दिवस आणि रात्रीच्या तापमानात 10 अंशांचा फरक दिसून येऊ शकतो. तर, ऑक्टोबर हिट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून जाणवण्यास सुरुवात होणार आहे.