Saif Ali Khan Photos With Salman Khan Ex Girlfriend: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 15 जानेवारी रोजी अभिनेत्यावर घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता अभिनेत्याचे सर्व चाहते आणि इतर कलाकार देखील तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड असलेली अभिनेत्री सोमी अलीने नुकतेच सैफ अली खानसोबतचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी तिने प्रार्थना केली आहे. सैफ अली खान आणि सोमी अलीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सोमी अलीने शेअर केले सैफसोबतचे जुने फोटो
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'आओ प्यार करें' चित्रपटाच्या सेटवरील थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोमी अलीसोबत अभिनेता सैफ अली खान आणि त्याची माजी पत्नी अमृता सिंग देखील दिसत आहे. तर तिने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये सैफ अली खानच्या कुटुंबातील इतर सदस्यही दिसत आहेत.
हे फोटो शेअर करताना सोमी अलीने फोटो कॅप्शन दिलं आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, 'सैफ बरा होत आहे, हे जाणून खूप आनंद झाला. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि प्रार्थना'. अभिनेता सैफ अली खान आणि सोमी अली यांनी 'यार गद्दार' आणि 'आओ प्यार करें' या दोनच चित्रपटात एकत्र काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाले होते.
सैफचा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
सैफ अली खानवर घरात घुसलेल्या हल्लेखोराने चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिनेत्याला खूप दुखापत झाली आहे. मात्र, लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सैफ अली खानवर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून आता तो लवकर बरा होत असल्याचं म्हटले आहे. त्याचवेळी मुंबई पोलिसांना हल्लेखोराला पकडण्यात यश आलं आहे. आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून ताब्यात घेतलं आहे.