Beed Guardian Minister Issue Dhananjay Munde Ajit Pawar: राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. बीडमधील मागील काही आठवड्यांमधील घाडमोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद नाकारण्यात आलं आहे. बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. अजित पवारांकडे पुण्याबरोबरच बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर काही तासांमध्ये धनंजय मुंडेंनी शिर्डी गाठली आहे. धनंजय मुंडे पहाटे चार वाजता शिर्डीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि अजित पवार दोघेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
धनंजय मुंडेंनी प्रकृतीचं कारण देत शनिवारी पक्षाच्या नवसंकल्प शिबिराला अनुपस्थित होते. मात्र आज अचानक पहाटे ते शिर्डीत दाखल झाले असून आज नवसंकल्प शिबिराला हजेरी लावणार आहेत. पालकमंत्रिपद डावलल्यानंतर धनंजय मुंडे पहाटे शिर्डीत दाखल झाले. शिर्डीतील 'हॉटेल सन अँड सँड'मध्ये ते मुक्कामी आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारही याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळेच आज सकाळी संकल्प शिबिराकडे रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता 'सन अँड सँड'मध्ये नेमकी काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.
नक्की वाचा >> 'बीडचे राजकारण, प्रश्न...', धनंजय मुंडेंऐवजी अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया
दरम्यान, अजित पवारांना बीडचं पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंनी फेसबुकवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे," असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List
तसेच, "बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो," असंही धनंजय मुंडे म्हणालेत.
नक्की वाचा >> पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये तुफान राडा! टायर जाळून रोखला मुंबई-गोवा हायवे
"सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील," असंही धनंजय मुंडे म्हणालेत.