Mumbai Local Train Update: मुंबईत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी अनेक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहेत. मुंबई लोकल तर मुंबईकरांची लाइफलाइन आहे. तसंच, मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा व्हावा यासाठी मेट्रोचे विविध प्रकल्पही हाती घेण्यात येत आहेत. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळं प्रवाशांना केवळ 300 ते 500 मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबईच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीमुळं प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी जलद व सुलभ होणार असून महसूल वाढीसह सार्वजनिक सेवांचा अधिकाअधिक वापर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीच्या मदतीने प्रवास करताना यात मोनो, मेट्रो, बस, बेस्ट, लोकल यांचा समावेश असणार आहे. यात सिंगल तिकिट व सिंगल प्लॅटफॉर्मवर व्यक्ती प्रवास करु शकेल. तसंच, अॅपच्या माध्यमातून एखादा व्यक्ती त्याचा प्रवास आधीपासूनच प्लान करू शकेल. AIच्या माध्यमातून व्यक्ती जिथे उभा आहे त्याच्यापासूनचे जवळचे स्टेशन व जवळचे पब्लिक ट्रान्सपोर्ट कोणते आहे हे सांगेल. घरापासून ते गंतव्यापर्यंत विनाअडथळा पोहोचण्यासाठी या अॅपचा वापर खूप सोयीचा ठरेल.
मुंबईत सध्या 3500 लोकल सेवा आहेत. आणखी 300 सेवांसाठी 17,107 कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वे करणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये 1.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणुक करण्यात आली आहे, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.