Maharashtra Rain : देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पाऊस अनेकांसाठीच काळ होऊन आला आहे. पण, इथं महाराष्ट्रावर मात्र त्यानं रुसवा धरल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. जून आणि जुलैचा पहिला आठवडा वगळला, तर त्याच महिन्याच्या अखेरपासून मात्र पावसानं जी दडी मारली, तो काही ऑगस्टच्या शेवटापर्यंत परतण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. राज्यातून पावसानं एकाएकी काढता पाय घेतल्यामुळं आता बळीराजापुढेही अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकिकडे शेतीचं नुकसान आणि दुसरीकडे कर्जाची टांगती तलवार अशाच परिस्थितीमध्ये हा शेतकरी अडकल्यामुळं आतातरी पावसानं परतावं अशीच आर्जव अनेकजण करताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच हवामान विभागानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरच पावसासाठी पूरक वातावरण निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली होती. ज्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख, डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पर्जन्यमान पाहता इथं पुढील दोन आठवडे तरी जोरदार पावसाची चिन्हं नाहीत. परिणामी आता जर पाऊस आला नाही तर, शेतकऱ्यांनी पिकांच्या स्थितीवरून पुढील नियोजन करावं, जमीन भुलभुशीत करावी परिणामस्वरुप आर्द्रता कायम राहील अशा सूचना केल्या. थोडक्यात सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडाच पावसाचा परत आणणार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
शुक्रवारी रात्रीपासूनच मुंबईसह नवी मुंबई, पश्चिम उपनगर आणि रायगड जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसाचं एकंदर चित्र आणि या भागांवर असणारी काळ्या ढगांची चादर पाहता उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अपववाद का असेना पण, मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. अलिबाग, नागोठणे, पेण, रोहा, कोलाड या भागांमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पावसानं काहीसा जोर धरला. तर, तिथे निफाड तालुक्यातील लासलगावसह विंचूर परिसरात रिमझिम पाऊस बरसला. ज्यामुळं माना टाकलेल्या पिकांना काही प्रमाणात तरी जीवदान मिळालं.
25 Aug, 9pm, latest satellite obs indicates scattered type clouds over parts of #Vidarbha, adj #Marathwada, south #Konkan & around, #Telangana, #KA & Coastal #AndhraPradesh.
Possibilities of light rains with occasional mod type pic.twitter.com/OrmMjsDlgX— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 25, 2023