Maharashtra Rain : मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये ऑक्टोबर हिटमुळं नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानाचा होणारी वाढ पाहता हवामान विभागाकडूनही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. आता त्यातच परतीच्या वाटेवर निघालेला पाऊस जाता जाताही राज्यातील काही भागात बसरणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागांतून पावसानं विश्रांती घेतलेली असली तरीही कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांमध्ये मात्र तो पुन्हा एकदा बरसणार आहे. कोकणातील किनारपट्टीनजीकच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसम्याची शक्यता आहे. तर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतही काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते.
मागील काही दिवसांपासून हवेतील गारवा काहीसा कमी झाला असून, राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दुपारचं तापमान 33 ते 35 अंशांवर पोहोचलं आहे. पण, किमान तापमानात मात्र 7 ते 8 अंशांची घट नोंदवली गेली आहे. हवामानात होणाऱ्या या बदलांचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्यामुळं अनेकांना सर्दी, खोकला, ताप अशा समस्याही सतावत आहेत. परिणामी यंत्रणांकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
इथं महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट आणि मधूनच परतीच्या पावसाच्या सरी असं वातावरण असताना तिथं देशातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. नुकतीच उत्तराखंडमधील पर्वतीय भागांमध्ये मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली. ज्यामुळं मैदानी क्षेत्रांमधील तापमानातही घट नोंदवण्यात आली.
पुढील 24 तासांमध्ये जम्मू काश्मीर, मुजफ्फराबाद, गिलगिट, बाल्टिस्तान आणि हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच भागांमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी हलक्या हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केरळ, तामिळनाडूचा अंतर्गत भाग, कर्नाटकचा किनारपट्टी भाग आणि आंध्रप्रदेशचा काही भाग पावसानं ओलाचिंब होऊ शकतो.