पाऊस की ऊन? पाहा नव्या आठवड्यात काय असतील हवामानाचे तालरंग

Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही पावसानं नव्हे तर अंशत: तापमानवाढ आणि पावसाच्या अनुपस्थितीतच झाली. पाहा नव्या आठवड्यात कसं असेल हवामान.... 

सायली पाटील | Updated: Aug 7, 2023, 07:50 AM IST
पाऊस की ऊन? पाहा नव्या आठवड्यात काय असतील हवामानाचे तालरंग title=
(द वेदर चॅनल)/ Maharashtra Rain updates lesser rainfall in this week except konkan and vidarbha

Maharashtra Rain Update : पावसानं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये उसंत घेतली असून, आता हा वरुणराजा शेतकरी वर्गाला चिंतेत टाकताना दिसत आहे. त्यातच हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मागीर काही दिवसांप्रमाणं पुढील चार दिवस राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. त्यामुळं ऊन पावसाचा खेळ कायम असेल हेच आता स्पष्ट होत आहे. 

राज्याच्या कोणत्या भागात पावसाची हजेरी? 

मुंबईसह उपनगरांमध्ये मागील आठवडा कोरडाच गेला. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरींचा अपवाद वगळता इतरत्र कुठेही पाऊस बरसल्याची माहिती मिळाली नाही. कोकण आणि राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरात मात्र पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी बरसल्या. 

सुरु आठवड्यामध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळणार आहे. कारण, कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि घाटमाथ्याचा परिसर वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये पुढील चार दिवस पावसाची उघडीप कायम राहणार आहे. 

हेसुद्धा वाचा : मुंबईकरांचा खोळंबा करणारी बातमी; 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, 704 बस आगारातच  

राज्याच्या किनारपट्टी भागातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथं सुटणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळं या पावसाची हजेरी पाहायला मिळेल. पुढल्या चार दिवसांसाठी राज्याच्या कोणत्याही भागाला तूर्तास कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. त्यामुळं चिंता करण्याची बाब नसली तरीही बळीराजाला मात्र शेतपिकांची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळं किमान शेतपिकांना पुरेसा पाऊस झालाच पाहिजे अशीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. 

मागील 24 तासांतील पावसाची आकडेवारी 

महाबळेश्वर 42 मिमी
वर्धा 19.9 मिमी
सातारा 9.6 मिमी
अमरावती 9.4 मिमी
रत्नागिरी 7.8 मिमी
सोलापूर 6.8 मिमी
डहाणू 5.7 मिमी

दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं राज्यातील बहुतांश धरणांमध्ये असणाऱ्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. इथं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झालेली असतानाच तिथं ठाण्याकडेही अशीच काहीशी परिस्थिती आहे. 

बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं बारवी धरण ओसंडून वाहू लागलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्राला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या घडीला धरणाच्या 11 पैकी 9 दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.