Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट; पाहा तुमच्या भागातील पर्जन्यमानाचा अंदाज

Maharahtra Rain : हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज पाहता पावसाच्या या दिवसांमध्ये घराबाहेर पडण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. आताच पाहा हवामानाची बातमी... पाहा तुम्ही राहता त्या भागात कसं असेल पर्जन्यमान 

सायली पाटील | Updated: Jul 26, 2023, 08:07 AM IST
Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट; पाहा तुमच्या भागातील पर्जन्यमानाचा अंदाज  title=
Maharashtra Rain Updates raigad ratnagiri satara pune red alert latest news

Maharahtra Rain News : दोन आठवडे उलटूनगही महाराष्ट्रात उसंत न घेणारा पाऊस आता जनसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करताना दिसत आहे. राज्याच्या बहुतांश भागांना पावसानं चिंब भिजवलं असून, काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगत सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णयही प्रशासन घेताना दिसत आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येसुद्धा राज्याच्या बऱ्याच भागाला पाऊस झोडपणार आहे. 

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची हजेरी असेल. पावसाच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, रायगड, रत्नागिरी आणि पुणे भागाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तिथं चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली भागाला यलो अलर्ट देत सतर्क करण्यात आलं आहे. थोडक्यात राज्यात पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची हजेरी असेल. 

रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळं जिल्ह्याच्या सर्वच भागात अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरड प्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मोठ्या पावसाच्या शक्यतेने जिल्हाधिकारी यांनी आज जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेसना सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आज पहाटे पासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी सर्वत्र ढग दाटून आले आहेत.

 

कोल्हापूरात यंत्रणा सतर्क 

पावसाचा सध्या कमी असणारा जोर आणि नदीतून मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 6 उंचावर स्थिर आहे. मध्यरात्रीपासून हे पाणी स्थिर असलं तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणारे राधानगरी धरण मात्र जवळपास 96 टक्के भरले आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नदीकडच्या गावांना सतर्क राहून स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.

हेसुद्धा वाचा : Konkan Railway : गणेशोत्सवाची सोय झाली; रेल्वे विभागाकडून विशेष गाड्यांच्या आरक्षणासंदर्भातील माहिती जाहीर 

 

दरम्यान, आठवडा मध्यावर आलेला असतानाच त्यातील उर्वरित दिवसांसाठीसुद्धा पावसाचीच शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या शुक्रवारपर्यंत राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, गुरुवारी रायगड, रत्नागिरी कोसळधार असेल असं सांगण्यात आलं आहे. पावसाची एकंदर परिस्थिती पाहता सध्या अनेकांनीच पावसाळी सहलींचे बेतही आखण्यास सुरुवात केली आहे. या साऱ्यामध्ये पावसाचा आनंद घेताना कुठेही गालबोट लागेल अशी घटना घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तर, यंत्रणाही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय.