Maharashtra Weather Update : पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा आता बहुतांशी कमी झाला असून, जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. थोडक्यात राज्यात आता उकाडा सुरु झाला आहे यावरच शिक्कामोर्तब झाल्याचं हवामान विभागाचा एकंदर अंदाज पाहून लक्षात येत आहे. राहिला मुद्दा पुढील 24 तासांमधील हवामानाचा तर, उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हीही आठवडी सुट्टीला धरून एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखत असाल, तर सर्वप्रथम संभाव्य तापमानाचा आकडा पाहून घ्या. कारण, दुपारच्या वेळी उन्हाचे चटके सोसण्यापेक्षा घराबाहेर पडण्याचा विचार सोडलेलं बरं.
पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये कमाल तापमान 39 अंशांच्या घरात राहू शकतं. तर, विदर्भाच्याच काही भागांमध्ये पावसाळी वातावरणाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भाग आणि तामिळनाडूपासून विदर्भाच्या काही भागापर्यंत कमी दाबाचा विरळ पट्टा तयार होत असल्यामुळं विदर्भावर पावसाळी ढग तयार होताना दिसत आहे. हवामानाच्या या स्थितीमुळं तापमानातील चढउतार प्रचंड उकाड्यामध्ये परावर्तित होताना दिसत आहेत.
आयएमडीच्या मुंबई शाखेतून मिळालेल्या माहितीनुसार शहरात पुढील 24 तासांसाठी हवामान कोरडं राहणार असून, उपनगरांमध्येही अशीच परिस्थिती असेल. आकाश निरभ्र राहणारस असून किमान तापमान 21 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर, राज्यातही हवामान कोरडं राहणार असून नाशिकमध्ये किमान तापमान 15 अंशांपर्यंत उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.