Maharahshtra Weather Updates : साधारण 24 तासांपूर्वी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, आता मात्र या हवामानानं पुन्हा एकदा तालरंग बदलल्याचं लक्षात आलं आहे. कारण, पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा संपूर्ण Weekend उष्णतेच्या झळा सहन करण्यातच जाणार आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते. ज्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून तापमान दुपारी 2 वाजेपर्यंत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं या वेळात घराबाहेर न पडलेलंच बरं. समुद्रकिनारा नजीक असणाऱ्या मुंबई, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळंही उकाडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.
सकाळच्या वेळी तीव्र ऊन असलं तरीही दिवस मावळतीकडे जाताना काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.
बंगालचा उपसागर आणि अंदमान -निकोबार बेटांच्या परिसरात ताटकळणारा मान्सून आता चांगल्या वेगानं पुढे प्रवास करताना दिसत आहे. गुरुवारी या वाऱ्यांनी अरबी समुद्राच्या क्षेत्रात प्रवेश केला असून, ते कोमोरिन, मालदीव आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागातही पोहोचले आहेत. सध्या हवामानाची परिस्थिती पाहता वारे पुढंही चांगल्या गतीनं प्रवास करतील. परिणामस्वरुप ते 4 जून रोजी केरळात आणि त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रात दाखल होतील.
स्कायमेट (Skymet) या खासगी हवामानाशास्त्र संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला एक पश्चिमी झंझावात हिमालयाच्या दिशेनं पुढे जात आहे. तर, या झंझावातामुळं पाकिस्तानचा उत्तर भाग आणि त्याला लागून असणाऱ्या भारतातील पंजाब प्रांतावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
परिणामी देशभरात पुढील 24 तासांमध्ये पंजाबसह हिमालयाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या भागात पावसाची हजेरी असेल. सोबतच आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, रायलसीमा, लक्षद्वीप येथे ही पावसाची हजेरी असेल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्याही काही भागांना पावसाचा मारा सहन करावा लागणार आहे. पण, हा मान्सून नाही ही बाब मात्र लक्षात घ्यावी.