Maharashtra Weather News : देशात सक्रिय झालेला मान्सून आता टप्प्याटप्प्यानं देशाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकताना दिसत आहे. हा मान्सून दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुलनेनं सक्रिय असला तरीही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मात्र त्याची मनमर्जीच पाहायला मिळत आहे, असं म्हणणं गैर ठरणार नाही. सध्याच्या घडीला मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी देशाच्या बहुतांश भागांमध्ये चांगलीच हजेरी लावली आहे. असा हा मान्सून येत्या काळात कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील परीसरामध्ये ढगांची दाटी करताना दिसेल. तिथं खानदेश आणि अमरावतीपर्यंत मान्सूनचे वारे मजल मारताना दिसतील. (Rain Updates)
सध्याच्या घडीला हवामानाची एकंदर स्थिती पाहता (Monsoon News) मोसमी वाऱ्यांची एक शाखा बंगालच्या उपसागरावर सक्रिय होत पुढे वाटचाल करत आहे. ज्यामुळं महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा दक्षिणोत्तर पट्टा सातत्यानं तयार होत आहे. त्यात भरीस अरबी समुद्रातून वेगाने वारे येत असल्यामुळे मोसमी पाऊस समाधानकारक वेगानं पुढे वाटचाल करण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या मोसमी पावसानं अखेर रविवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. ज्यानंतर राज्यात साधारण पुढचा आठवडाभर पावसाची हजेरी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम किनारपट्टी भागावर ढगांची दाटी पाहायला मिळेल. पण, हा पाऊस मात्र निवडक भागांवरच कृपा दाखवताना दिसेल. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेनं जास्त राहील. काही भागांमध्ये मात्र पाऊस चकवा देत अनेकांचीच हिरमोड करताना दिसणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुञील 72 तास मुंबई आणि नजीकच्या किनारपट्टी भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याच धर्तीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं असलं तरीही पावसाची गेल्या काही दिवसांपासूनची स्थिती पाहता काळ्या ढगांची दाटी चकवा देऊन गेली तर अप्रूप वाटू नये.
IMD च्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून गुजरातच्या दक्षिण भागांमध्ये फार आधीच पोहोचला. पण, त्यानंतर मात्र त्याचा वेग बऱ्याच अंशी मंदावला. आता इतर राज्यांमध्ये हाच मान्सून सक्रिय झाला असून, अरबी समुद्राच्या उत्तरेकडून मान्सूनचे वारे पुढे सरकत आहेत. परिणामी, गुजरातच्या उर्वरित भागासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा आणि झारखंडच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनची हजेरी पाहायला मिळेल. पुढे अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशातील पर्वतीय भागांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.