सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार वांद्रे येथून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेला 30 तासांहून अधिक कालावधी उलटल्यानंतर पोलिसांना पहिलं यश मिळालं आहे. गुरुवारपासून मुंबई पोलिसांची 20 शोध पथके संशयिताचा शोध घेत होते.
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध शाखेची 20 शोध पथके गेल्या 30 तासांनपासून कार्यरत आहेत. झोन 9 मधील क्राइम ब्रांच सोबतच एटीसी पथकाचाही समावेश आहे. आरोपी हल्ला करून पळाल्यानंतर साधू वासवानी चौक परिसरात कपडे बदलून वांद्रे स्टेशनकडे जात असताना दिसला अशी सुत्रांची माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपीने कपडे बदलल्याचा रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती देखील पोलिसांच्या हाती आहे.
बुधवारी मध्यरात्री सैफ अली खान याच्या वांद्रे येथील राहत्या घरात दरोडेखोर घुसला. जेहच्या नॅनीवर हल्ला करत असताना सैफ अली खानने बचावासाठी त्या वादात गेला. या दरम्यान दरो़डेखोराने सैफ अली खानवर 6 वार केले. यातील 2 वार गंभीर असून त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात मुलगा इ्ब्राहिमने रिक्षाने दाखल केलं.
सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी हेल्थ बुलेटिन घेऊन तब्बेतीबाबत माहिती दिली. तसेच त्याची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली असून तो धोक्याबाहेर असल्याच सांगण्यात आलं. जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा सैफ, दोन्ही मुलं आणि करीना सगळेच घरी होते.
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा करीना कपूरने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने चाहत्यांचे मीडियाचे आभार मानले आहेत. तसेच हा काळ अतिशय कठीण होता. हे सगळं घडलं आहे यावर विश्वास बसत नसल्याचं सांगितलं. एवढंच नव्हे तिने मीडिया आणि पापाराझी यांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच हा क्षण आम्हाला कुटुंबासोबत घालवायचा आहे. तर आमच्या खासगी वेळेचा सन्मान करावा अशी विनंती केली आहे.
सैफ अली खान या हल्ला प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची क्राइम ब्रांच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. या टीमला दया नायक लीड करत आहेत. दया नायक मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी असून एनकाऊंटर स्पेशालिस्ट आहे.