Saif Ali Khan Staff Nurse Statement: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी तपास करण्यासाठी 20 पथकं तयार केली आहेत. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून, त्याचा शोध घेतला जात आहे. हल्ल्यानंतर पळून जाताना इमारतीच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर बॉलिवूड हादरलं असून, सुरक्षेवरुन प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे पोलिसांनी सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्यांची चौकशी करत जबाब नोंदवले आहेत.
श्रीमती एलीयामा फिलीप, वय 56 वर्षे, व्यवसाय स्टाफ नर्स, रा.ठी 12 वा माळा, सदगुरु शरण, जंक्शन 24 व 25 रोड, ग्रॅण्ड रेसिडन्सी हॉटेल समोर, थिरीसा स्कुल जवळ, वांद्रे (प) मुबंई-50.
मी वरीलप्रमाणे असून वर नमुद पत्त्यावर मागील 4 वर्षापासुन रहावयास आहे. मी मागील 4 वर्षापासुन सिने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे. मी सिने अभिनेता सैफ अली खान यांचा छोटा मुलगा जहांगीर उर्फ जयबाबा वय04 वर्षे यास सांभाळण्याचे काम करत असते. सैफ अली खान याचा परिवार 11 वा व 12 व्या माळयावर वर रहावयास आहे. 11 व्या माळयावर 3 रूम असुन त्यातील एका रूममध्ये सैफ सर व करीना मॅम रहावयास आहे. दुसरी तैमुरची रूम आहे. तैमूरच्या रूममध्ये त्याची देखभाल करण्याकरीता गीता नर्स असते. तसंच त्या रूममध्ये जयबाबा रहावयास असुन त्याची देखभाल मी व जुनू करत असतो. जुनु देखील आयाचे काम करते.
दिनांक 15/01/2025 रोजी रात्री 11.00 वा च्या सुमारास मी जयबाबाला जेवण करून झोपवले. त्यानंतर मी व जुनु बेडच्या खाली झोपी गेलो. दिनांक 16/01/2025 रोजी पहाटे साधारण 02.00 वा च्या सुमारास मला काहीतरी आवाज झाल्याने जाग आली. त्यामुळे मी झोपेतून उठुन बसले. त्यावेळी मला रूममधील बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला व बाथरूमची लाईट चालू दिसली. तेव्हा मला करीना मॅम जयबाबाला भेटण्यास आल्या असव्यात असे समजुन पुन्हा झोपी गेले. पंरतु मला काहीतरी चुकीचे होत असल्याचा पुन्हा भास झाला. त्यामुळे मी पुन्हा उठुन बसले. त्यावेळी बाथरूमच्या दरवाज्यावर एक टोपी घातलेल्या इसमाची सावली दिसली. त्यामुळे मी वाकून बाथरूम मध्ये कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करीत असताना बाथरूममधून एक इसम बाहेर येऊन तो जयबाबाच्या बेड जवळ जावु लागला. ते पाहुन मी पटकन उठले व जयबाबाजवळ गेले. त्यावेळी त्याने त्याच्या तोंडाजवळ बोट नेवुन शुक शुक केले व "नो आवाज" असे हिंदीत बोलला. त्याचवेळी जयबाबाची आया जुनूदेखील झोपेतून उठली. ते पाहुन तो इसम तिला देखील "कोई आवाज नही और कोई बाहर भी नहीं जाएगा" असे बोलुन धमकावले. त्यावेळी मी जयबाबाला उचलण्यास गेली असता तो माझ्या अंगावर धावून आला. त्यावेळी त्याच्या डाव्या हातात लाकडासारखी काहीतरी वस्तु होती व उजव्या हातात लांब पातळ हेक्सा ब्लेड सारखी हत्यार होते. त्यावेळी झालेल्या झटापटीत त्याने माझ्यावर हेक्सा ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला. मी हात पुढे करून ते वार वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या दोन्ही हाताच्या करगंळी जवळ तसेच डाव्या हाताच्या मधल्या बोटावर ब्लेडच्या वारामुळे जखम झाली. त्यावेळी मी त्याला विचारले "आपको क्या चाहिए. तेव्हा तो बोलला "पैसा चाहिए" मी विचारले "कितना चाहिए." तेव्हा तो इंग्रजीतुन बोलला "वन करोड."
त्याचवेळी संधी साधून जुनू ओरडत रूमच्या बाहेर गेली. तिचा आवाज ऐकून सैफ सर व करीना मॅडम धावत रूममध्ये आले. त्या इसमास बघुन सैफ सरांनी त्यास "कोण है, क्या चाहिए" असे विचारले तेव्हा त्याने हातातील लाकडी वस्तु व हेक्सा ब्लेड सारख्या हत्याराने सैफ सरांवर हल्ला केला. त्यावेळी गीता मधे आली असता तिच्याशी देखील त्या इसमाने झाटापट केली व तिच्यावरही हल्ला केला. त्यावेळी सैफ सरांनी त्याच्यापासुन कशीबशी सुटका करून घेतली व आम्ही सर्व रूमच्या बाहेर धावलो आणि रूमचा दरवाजा ओढुन घेतला. नतंर आम्ही सर्व वरच्या माळ्यावरील रूमकडे धावलो. तोपर्यत आमचा आवाज ऐकून स्टाफ रूममध्ये झोपलेले रमेश, हरी, रामु व पासवान हे बाहेर आले. त्यांच्यासह आम्ही पुन्हा रूमकडे गेलो असता रूमचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी त्या इसमाचा घरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
सदर घटनेत सैफ सरांच्या मानेच्या पाठीमागील बाजूस, उजव्या खांदयाजवळ, पाठीवर डाव्या बाजूस तसेच डाव्या हाताच्या मनगटाजवळ आणि कोपराजवळ जखमा होऊन त्यातुन रक्त येत होते. तसेच गीता हिच्या देखील उजव्या हाताच्या मनगटाजवळ, पाठीवर व चेहऱ्यावर जखमा झालेल्या आहेत.
जयबाबाच्या रूम मध्ये घुसुन माझ्यावर तसेच सैफ सर तसेच गिता यांच्यावर हल्ला करणारा इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे:-
एक अनोळखी इसम वय अंदाजे 35 ते 40 वर्षे, सावळा वर्ण, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 5 इंच, नेसणीस काळसर रंगाची पॅन्ट व गडद रंगाचे शर्ट व डोक्यावर कॅप घातलेला. सदर इसमास पुन्हा पाहिल्यास मी ओळखेन.
तरी आज दिनांक 16/01/2025 रोजी पहाटे 02.00 वाजताच्या सुमारास भी सैफ सरांचा व करीना मॅडमाचा लहान मुलगा जयबाबा वय 4 वर्षे व त्याची आया जुनू वय 30 वर्षे यांच्यासह बेडरूममध्ये झोपली असताना वर नमुद वर्णनाच्या एका अनोळखी इसमाने जबरी चोरी करण्याच्या इरादयाने हातात लाकडा सारख्या वस्तू व हेक्सा ब्लेडसारख्या हत्यारासह अनधिकृतरित्या घरातील रूममध्ये प्रवेश करून माझ्याकडे पैशाची मागणी करून त्याच्या हातातील साधनानीशी माझ्यावर तसेच जुनू हिच्यावर आणि तेथे आलेल्या सैफ सर यांच्यावर वार करून आम्हाला जबर जखमी केले म्हणून माझी त्याच्या विरुद्ध तक्रार असुन कायदेशीर कारवाई होणेस विनंती आहे.