BCCI चा भारतीय खेळाडूंना मोठा धक्का! 10 Point Policy लागू; गंभीरमुळे सगळेच अडकले

BCCI 10 Point Policy for Indian Players: भारतीय संघाच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोर पावलं उचलल्याचं दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 17, 2025, 10:24 AM IST
BCCI चा भारतीय खेळाडूंना मोठा धक्का! 10 Point Policy लागू; गंभीरमुळे सगळेच अडकले title=
बीसीसीआयचा खेळाडूंना मोठा धक्का (प्रातिनिधिक फोटो)

BCCI 10 Point Policy for Indian Players: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेटपटूंसाठी एक कठोर नियमावली जारी केली आहे. बीसीसीआयने नव्या धोरणांमध्ये काही गोष्टी अनिवार्य केल्या असून पूर्वापार चालत असलेल्या काही गोष्टींमध्ये अमुलाग्र बदल केले आहेत. नव्या धोरणांमुळे खेळाडूंवर अनेक बंधनं येणार आहेत. 

कोणते नियम बदलले?

ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमध्ये भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेतले आहेत. यापुढे 45 दिवसांहून अधिक मोठा परदेश दौरा असेल तर खेळाडूंना जास्तीत जास्त दोन आठवडे आपल्या कुटुंबाला सोबत राहण्याची परवानगी असेल. घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्व खेळाडूंनी खेलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच परदेश दौऱ्यावर जाताना खासगी स्टाफ म्हणजेच स्वयंपाकी, मदतनीस नेण्यास परवानगी यापुढे नसेल. त्याचप्रमाणे मालिका सुरु असताना खेळाडूंना खासगी जाहिराती शूट करता येणार नाही.

बीसीसीआयने जारी केलेल्या 10 कलमी धोरणांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. जर या नियमांचं खेळाडूंनी पालन केलं नाही तर त्यांच्याविरोधात बीसीसीआय कारवाई करेल. भारतीय खेळाडूंना परदेश दौऱ्यादरम्यान स्वतंत्रपणे भटकंती करण्याची परवानगी नसेल. त्याचप्रमाणे सामना लवकर संपला तर खेळाडूंना लवकर घरी येता येणार नाही, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

का लागू करण्यात आले हे नियम?

भारतीय क्रिकेट संघाची शिस्त आणि एकता अधिक मजबूत व्हावी या उद्देशाने नवीन धोरण लागू करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील पराभव आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानांवरील मालिकेत सुपडा साफ झाल्यानंतर संघात दोन गट पडल्याचं सांगितलं जात होतं. खेळाडू एकमेकांबरोबर एकत्र बसतही नसल्याच्या बातम्याही समोर आल्या. त्यामुळेच बीसीसीआयने आता नवीन नियम आणि धोरणं लागू केली आहेत. या माध्यमातून खेळाडूंच्या खेळावर साकारात्मक परिणाम होईल आणि कामगिरी सुधारेल अशी अपेक्षा आहे.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या सल्ल्यानुसार हे नवे नियम जारी केले आहेत. गंभीरला भारतीय क्रिकेटमधील स्टार कल्चर संपवायचं आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय संघाच्या पराभवाच्या समिक्षा बैठकीमध्ये गंभीरने या कठोर निर्बंधांची मागणी केली होती. स्टार क्रिकेटपटू रणजी सामन्यापासून दूर राहतात, याचा विचार करुनही घरगुती क्रिकेट स्पर्धा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. 

10 नियम कोणते?

> खेळाडूंना आपल्या कुटुंबाला जास्ती जास्त दोन आठवडे सोबत ठेवता येईल. (45 दिवसांहून मोठा दौरा असेल तर)
> घरगुती क्रिकेट स्पर्धा खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे.
> मालिका सुरु असतानाच खेळाडूंना जाहिरातींचं शूटींग करता येणार नाही.
> दौऱ्यादरम्यान कोणत्याही एखाद्या विशिष्ट खेळाडूला एकट्याने प्रवास करता येणार नाही. त्याला संघाबरोबरच रहावं लागेल.
> दौरा किंवा सामना लवकर संपला तर खेळाडूंना लवकर परतता येणार नाही.
> सर्व खेळाडू सरावासाठी एकत्र जातील आणि परत येतील.
> 150 किलोग्रामपेक्षा अधिक जास्त सामना खेळाडूंनी घेतलं तर अतिरिक्त वजनाचे पैसे खेळाडूंना भरावे लागतील.
> खेळाडूंना आपले खासगी मॅनेजर, स्वयंपाकी, मदतनीस, सुरक्षारक्षकांना दौऱ्यावर घेऊन जाता येणार नाही.
> बीसीसीआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजर राहणं आवश्यक असेल.
> संघ व्यवस्थापनाबरोबर सेंटर ऑफ एक्सिलन्समधील उपकरणे पाठवण्यासाठी समन्वय साधणे आवश्यक असणार.