Maharashtra Weather News : पहाटे गारवा, दुपारच्या वेळेत कडाक्याचं ऊन आणि दिवस मावळतीला जाताना सुटणारे वारे असंच काहीसं हवामान मागील काही दिवस पाहायला मिळत आहे. मुळात सध्या राज्याच्या काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण वगळता उर्वरित राज्यामध्ये काही अंशी थंडीची चाहूल लागताना दिसत आहे.
सध्या मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यासह विदर्भातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठी या भागात पावसाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, सातारा आणि मराठवाड्यात बीड, नांदेडमध्ये काही भागात वादळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. ऊन, वारा आणि पावसाच्या साथीनं असणाऱ्या या हवामानामुळं राज्यातील तापमानात फरक पडल्याचं पाहायला मिळेल.
सध्या देशाच्या दक्षिणेकडील राज्यांवर ढगांचं सावट वगळता छत्तीसगढ आणि ओडिशा इथं वाऱ्यांची चक्राकार स्थिती पाहायला मिळत आहे. ज्यामुळं मराठवाडा आणि विदर्भाील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. दरम्यान, आता राज्यात हळुहळू थंडीसुद्धा तग धरताना दिसत आहे. ज्यामुळं राज्यभरात थंडीची चाहूल लागली असून, किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली आल्याचं पाहायला मिळत आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागली असल्याचं सांगितलं जात असून, अनेक ठिकाणी किमान तापमान 20 अंश आणि त्याहीपेक्षा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अपवादात्मक ठिकाणं वगळता कमाल तापमानही 34 अंश सेल्सिअसच्या आत आहे. तिथं दक्षिण कोकण आणि दक्षिण- मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळं तुरळक ठिकाणी हलका पाऊस मात्र नाकारता येत नाही.