Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाळ्याला सुरुवात झाली असली तरीही हवामान विभागाच्या माहितीनुसार हा उन्हाळा सोबत अवकाळी पावसाळाही घेऊन आला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह ठाणे, पालघर भागामध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. तर, किनारपट्टी क्षेत्रांमध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाणही अधिक असणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळीची हजेरी असणार आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील 24 तासांसाठी तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या 24 तासांत येथील काही भागांना वादळी पावसासह गारपीटीनं झोडपलं होतं. हीच परिस्थिती कायम राहणार असून गारपीट आणि वादळी पाऊस विदर्भाची पाठ सोडणार नाही ही वस्तूस्थिती.
विदर्भात पावसाची सद्यस्थिती पाहता हवामान विभागानं दिलेला ऑरेंज अलर्ट्चा इशारा इथं चिंतेत बर टाकताना दिसत आहे. तर, मंगळवारपर्यंत मराठवाड्याच पावसाचा यलो अलर्ट लागू असेल. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेश आणि मराठवाड्यापासून कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत त्याचे परिणाम दिसून येत आहेत. महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसत असल्यामुळं तापमानातही चढ- उतार पाहायला मिलत आहेत.
इथं विदर्भात ही स्थिती असताना तिथं सोलापूरात तापमान 40.2 अंशांवर पोहोचलं आहे. अकोल्यामध्ये हा आकडा 39 अंशांवर स्थिर आहे. ऊन- पावसाचा हा लपंडाव सुरु असल्यामुळं उडाका मात्र आता दुपटीनंम जाणवत असून, तो आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.