Maharashtra weather Update: यंदाची दिवाळीही पावसाळी...; राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra weather Update: राज्यातील हवमानात पुन्हा एकदा बदल झाले असून, ऐन हिवाळ्याच्या मोसमामध्ये मान्सूनप्रमाणं पाऊस बरसल्याचं पाहायला मिळालं. 

सायली पाटील | Updated: Nov 9, 2023, 08:13 AM IST
Maharashtra weather Update: यंदाची दिवाळीही पावसाळी...; राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा  title=
Maharashtra weather Update latest news rain preditions in many districts

Maharashtra weather Update : ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपासूनच मान्सूननं राज्यातून काढता पाय घेतला आणि गुलाबी थंडीची चाहूल लागली. तिथं खरीप पिकांची काढणी होऊन रब्बी पिकांच्या कामाला प्रचंड वेग आला आणि पावसाच्या अनपेक्षित हजेरीमुळं सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. बुधवारी सिंधुदुर्गापासून कोल्हापुरापर्यंत पावसाची हजेरी पाहरायला मिळाली. तिथं दक्षिण भारतामध्येही बहुतांश राज्यांना पावसानं झोडपलं.

मुंबईसुद्धा याला अपवाद ठरली नाही. बुधवारी सायंकाळी दक्षिण मुंबईमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. ज्यामुळं नागरिकांचाही गोंधळ उडाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पावसाची हजेरी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. ज्यामुळं यंदाची दिवाळी पावसाळी असेल हेच स्पष्ट होत आहे. 

दक्षिण भारतात सुरु असणाऱ्या पावसाचा काहीसा परिणाम म्हणून गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली भागात गुरुवात- शुक्रवारी पावसाची हजेरी असेल. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये आकाश अंशत: ढगाळ असेल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

हेसुद्धा वाचा : मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट; आता करता येणार नरिमन पॉईंटहून थेट पालघरपर्यंतचा प्रवास, तोसुद्धा सुस्साट....

सध्याच्या घडीला पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार झालं आहे. ज्यामुळं पावसासाठी पोषक वातावरणही तयार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्यामुळं राज्यातील तापमानाच मोठे बदलही पाहायला मिळत आहेत. तिथं पुणे आणि साताऱ्यामध्ये रात्रीचं आणि पहाटेचं किमान तापमान सरासरीहून कमी असल्यामुळं या भागांमध्ये गुलाबी थंडी अनुभवता येत आहे. 

देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्येही हवामान बदल 

फक्त दक्षिण भारत आणि महाराष्ट्रच नव्हे, तर तिथं उत्तरेकडे आणि ईशान्येला असणाऱ्या राज्यांमध्येही पावसाची चिन्हं पाहता येत आहेत. उत्तराखंड आणि हिमाचलसह जम्मू काश्मीरच्या मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते असा इशारा आयएमडीनं दिला असून, याच राज्यांच्या पर्वतीय आणि डोंगराळ क्षेत्रांमध्ये मात्र कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुट्टीच्या निमित्तानं या राज्यांमधील पर्यटनस्थळी जाण्याच्या विचारात असाल तर, प्रत्येक ऋतूच्या अनुषंगानं सामानाची बांधाबांध करणं उत्तम!