Maharashtra weather updates : नव्या वर्षाची सुरुवात झालेली असतानाच आता राज्याच्या आणि देशाच्याही हवामानानं नव्यानं तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. राज्यांनुसार सध्या हवामान सातत्यानं बदलत असून ऋतूचक्राचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याचं या हवामानाकडे पाहून लक्षात येत आहे. मागच्या काही दिवसांपासून जी थंडी राज्यात जोर धरू लागली होती, तिच आता मात्र दडी मारताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर राज्यात सध्या पावसाची चिन्हंही दिसत आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होणार असून, विदर्भाच्या पूर्व भागात मात्र थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तर, राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेनं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाऱ्यांमुळं आठवड्याच्या मध्यापासूनच राज्यावर पावसाचे ढग दिसतील. आठवडाअखेरीस या प्रणालीला वेग येणार असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची चिन्हं असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानाची नोंद सध्या अनुक्रमे रत्नागिरी (35 अंश) आणि गोंदिया (12.4 अंश) येथे करण्यात आली.
पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असतानाच पुढील काही दिवसांसाठी किमान तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होणार आहे. दरम्यान, पावसाच्या सरींमुळं दिवसाही हवेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नवी मुंबईत मात्र तापमानात होणारी वाढ कायम राहणार असून उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत. तर, शहरामध्ये धुरक्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं दृश्यमानताही प्रचंड कमी राहणार आहे.
देश पातळीवर हवामानाचा अंदाज घ्यायचा झाल्यास सध्या उत्तरेकडील राज्यांमध्येही तापमानात चढ उतार पाहायला मिळत असून, पुढील दोन दिवसांत थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरुवात होणार आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमसह झारखंड, ओडिशामध्येही दाट धुक्यासह तापमानाच घट नोंदवली जाणार असल्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.