मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च; विरोधक आक्रमक

खर्चाचा आकडा सर्वसामान्यांमध्येही चर्चेचा विषय 

Updated: Feb 13, 2020, 11:36 AM IST
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च; विरोधक आक्रमक  title=
खर्चावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद

मुंबई : सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीवर विरोधी पक्षाकडून निशाणा साधण्यात आला. त्यातच आता त्यांचा सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठी आणखी एक निमित्त मिळालं आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरु आहे तो म्हणजे मंत्रीमहोदयांच्या बंगल्याच्या मुद्द्यावरुन.

महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी आपआपल्या बंगल्यांमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू केलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला या कामासाठी १४ कोटीं रुपयांहून अधिक खर्च येत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. 

नुतनीकरणासाठी काम काढण्यात आलेल्या बंगल्यांमध्ये अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या 'रामटेक' बंगल्यासाठी १ कोटी ४८ लाख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या 'रॉयल स्टोन' बंगल्यासाठी १ कोटी ८० लाख, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'मेघदूत' बंगल्यासाठी १ कोटी ३० लाख, तर 'सातपुडा' बंगल्यासाठी देखील १ कोटी ३० लाख असा खर्च येणार आहे. अशा पद्धतीने ८० लाखांपासून ते सव्वा-दीड कोटींपर्यंत नूतनीकरणाचा खर्च सध्या सुरु आहे. 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

नुतनीकरणाचं काम फक्त मंत्र्यांच्याच बंगल्यात होत आहे, असं नाही. तर, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेता म्हणून मिळालेल्या 'सागर' बंगल्याच्या नुतनीकरणासाठीही तब्बल ९३ लाखांचा खर्च येत असल्याची माहिती पुढे आली आहे. खर्चाचा हा आकडा पाहता आता या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे.