Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांच्यासह लाखोंच्या संख्येने मराठा कार्यकर्तेही पोहोचले आहेत. नवी मुंबईत पोलिसांनी मनोज जरांगे यांना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गात बदल करण्याची विनंती केली असून, त्यांनी ती मान्य केलं आहे. दरम्यान यावेळी मनोज जरांगे यांनी आपल्याकडून खोटं बोलून सही केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी जाहीरपणे अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे.
"एका अधिकाऱ्याने माझ्याकडून एका कागदावर सही घेतली. एका मराठीत आणि दुसरं इंग्रजीत होतं. मी ते वाचलंच नाही. कोर्टाचं कागदपत्रं असल्याचं सांगत माझ्याकडून सही घेतली. उपोषणाला इथे बसू नका, तिथे बसू नका असं त्यावर लिहिलेलं होतं. उगाच खोटं बोलू नका. पोलीस होता का कोण होता ते माहिती नाही. मी झोपेत असल्याने चुकून सही केली. पण सही घेतली असली तरी आझाद मैदानातच उपोषणाला बसणार आहे. पण अशी खोटी फसवणूक करु नका. गोड बोलून सही नेली. मी काय बारकं पोरगं नाही. पण मी झोपेत होतो आणि सभेला उशीर झाला होता. कोर्टाचा सन्मान करत असल्याने सही केली," असा खुलासा मनोज जरांगे यांनी केला आहे.
मी आझाद मैदानात जाण्यावर ठाम आहे. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी येण्याची विनंती केली आहे. ते न आल्याने आता मी आझाद मैदानला जात आहे असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
नवी मुंबई पोलिसांनी रुग्णांची अडचण होऊ नये यासाठी मनोज जरांगे यांना पळसपे मार्गे जाण्याची विनंती केली आहे. जुन्या हायवेवरुन जाताना कळंबोलीच्या अलीकडे पळसपे फाटा आहे. गव्हाण फाट्यावरुन किल्ला जंक्शनजवळून मुख्य रस्त्यावर येतील. यानंतर पाम बीचवरुन एपीएमसी रोडला जाऊ शकतात.