Maratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक

Maratha Reservation Morcha Traffic Route: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन लक्षवेधी आंदोलन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत.   

सायली पाटील | Updated: Jan 25, 2024, 10:02 AM IST
Maratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक title=
Maratha Reservation ralley manoj jarange protest traffic route changed latest update

Mumbai Pune Highway Traffic Advisory: मराठा आंदोलकांचा मोर्चा मुंबईत (Maratha Morcha Mumbai) दाखल होण्यमासाठी काही तास उरलेले असतानाच या मोर्चाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा मोर्चा एक्‍सप्रेस वे ऐवजी जुन्‍या मुंबई पुणे हायवेने (Mumbai Pune Highway) पुढे आणण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणांनी केल्या आहेत. ज्यामुळं आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही मोर्चा मात्र थांबलेला नाही. 

सध्या लोणावळ्यामध्ये असणाऱ्या या मोर्चाचा मुक्काम 25 जानेवारीला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट या ठिकाणी असल्याने एपीएमसी परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 25 जानेवारीला दुपारी 2 वाजल्यापासून ते 26 जानेवारीरोजी दुपारी 2 वाजेपर्यंत एपीएमसी परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. 

मोर्चा या भागात असेल त्यादरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या अवजड, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराच्या सर्व मार्गांवरून वाहतूक बंद असून, वाहनांच्या पार्किंगवरही बंदी घालण्यात आली आहे.  यामधून  पोलीस वाहनं, अग्निशमन वाहनं, जीवनावश्यक वाहनं, रुग्णवाहिका, पदयात्रेसोबत असणारी वाहनं आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बस वगळण्यात आल्या आहेत. 

हेसुद्धा वाचा : Maratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चामध्ये मोठा बदल;  आंदोलकांमध्ये नाराजी 
 

काय आहेत वाहतुकीतील बदल? 

मराठा मोर्चा बोरघाट मार्गे नवी मुंबईत दाखल होईल. ज्यामुळं तुर्भे उड्डाणपूल ते वाशीतील छत्रपती शिवाजी चौक असा दोन्ही बाजूंचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. येथील वाहतूक पनवेल-सायन मार्गाने वाशी प्लाझा येथून वळवण्यात येईल. 

बोनकोडे सिग्नलकडून पुनित कॉर्नरमार्गे माथाडी भवनकडे येणारा मार्ग बंग असेल. तर, महापे-पावणे पूल कोपरखैरणेवरून येणारी सर्व वाहनं पामबीच रोडने अरेंजा सिग्नल मार्गे अपेक्षित ठिकाणी पोहोचतील. दरम्यानच्या काळत अरेंजा सिग्नलकडून तुर्भेकडे जाणारा मार्ग बंदच असेल. तर, पामबीच रोडवरील कोपरी ते अरेंजा सिग्नलदरम्यान एपीएमसी मार्केटकडे येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.