मुंबई : वृक्ष लागवडीला वसा प्रत्येकानेच उचलला पाहिजे पण, यामध्ये वास्तविकता लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हीच बाब अभिनेते आणि समाजकार्यासाठी कायम पुढाकार घेणाऱ्या सयाजी शिंदे यांनी प्रकर्षाने मांडली आहे. आपलं म्हणणं मांडताना त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात ३३ कोटी वृक्ष लागवडीचं थोतांड सुरू आहे का, असा सवाल अभिनेता सयाजी शिंदेंनी विचारला आहे. वृक्ष लागवडीच्या या कामात फक्त सरकारच जबाबदार आहे का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा मुद्दा कायमच शिंदे यांनी सर्वांसमोर मांडला.
दरम्यान, ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेविषयी मात्र ते फारसे समाधानकारक नसल्याचं स्पष्ट झालं. आपण या योजनेसंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सचिवांनाही भेटलो असं सांगत ही योनाच मुळात निव्वळ मूर्खपणा असल्याचं वक्तव्य त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं.
आजही गुलमोहर, सुबाभळ या वृक्षांची शिक्षकांकडूनच लागवड केली जाते. ज्या झाडांची मुळात गरज नाही तीच झालं आज शिक्षण संस्थांमध्ये लावली जात आहेत, असं म्हणत सरकारच्या या धोरणांवर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय अशा गुलमोहर, उंदीरमारं अशा वृक्षांची लागवड न करण्यासंबंधीचा जीआर काढण्याचा पर्यायही आपण सरकारकडे सुचवला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्याच्या घडीला आपण या परिसअथितीविषही अधिक माहिती मिळवत असल्याचंही ते म्हणाले.
सरकारकडून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाल्याचा दावा करण्य़ात येत असला तरीही त्याची अंमलबजावणी योग्य रितीने होतेय का याबाबत शिंदेंनी शंका उपस्थित केली. नुसत्या घोषणा नको, अंमलबजावणी व्हायला हवी अशी स्पष्ट भूमिका सयाजी शिंदे यांनी मांडली.