रत्नागिरी : खेड तालुक्यातील सुकीवली चव्हाणवाडी येथील नववी इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्याने तालुका हादरुन गेलाय. याप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत चव्हाण याला अटक केलीय. नराधमाने मुलीचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकला होता. मुलीचा मृतदेह शौचालयाच्या टाकीतून बाहेर काढताच तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही आपले अश्रू आवरता आले नाही.
सुकीवली चव्हाणवाडी येथील नववी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्याऱ्याला अटक कऱण्यात आली आहे. चव्हाणवाडी येथे राहणारी ही अल्पवयीन मुलगी भरणे नाका येथील हायस्कूलमध्ये शिकत होती. काल सायंकाळी शाळा सुटल्यावर रिक्षा पकडून ती नेहमीप्रमाणे घरी जायला निघाली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालकांने तिला सुकीवली चव्हाणवाडी स्टॉपवर सोडल्यावर ती घरी पायी चालत जात असताना तिच्याच मागावर असलेल्या त्याच वाडीतील सूर्यकांत नवनाथ चव्हाण (२०) या हैवानाने तिच्यावर झडप घातली. तिने आरडाओरडा करु नये म्हणून तिचे तोंड दाबून तिला स्वतःच्या घरात ओढून नेले. या ठिकाणी तिच्यावर त्याने बलात्कार केला.
आपले कृत्य बाहेर पडू नये म्हणून त्या नराधमाने तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. थंड डोक्याने मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर सूर्यकांत हा पळून जाण्यासाठी खेड एसटी स्थानकावर आला. दरम्यान, काळोख पडायला आला तरी शाळेत गेलेली आपली मुलगी घरी न परतल्याने कुटुंब काळजी होते. तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र ती कुठेच आढळून न आल्याने घाबरलेल्या नातेवाईकांनी खेड पोलीस स्थानकात येऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. यावेळी त्यांनी संशयित आरोपी म्हणून सूर्यकांत चव्हाण याच्यासह अन्य काहीजणांची नावे दिली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे व खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.टी.नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरवात केली. पोलिसांनी तात्काळ सूकीवली चव्हाणवाडी येथे जावून सूर्यकांत याच्या घराची तपासणी केली असता त्यांना त्या ठिकाणी मुलीचा हेअरबँड तसेच भाताच्या कणगीत लपवून ठेवलेली तिची चपल मिळाली. घरातील एका पत्र्याच्या ट्रंकची झडती घेतली असता त्या टँकमध्ये मुलीचे दप्तरही आढळून आले. या तिन्ही वस्तू आपल्याच मुलीच्या असल्याचे तिच्या वडिलांनी ओळखले. या प्रकरणात सूर्यकांत याचाच हात असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले.
या धक्कादायक प्रकरणातील आरोपी पळून जावू नये म्हणून खेड पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानक, भरणे नाका आणि खेड एसटी स्थानक येथे सापळा रचला. साध्या गणवेशातील पोलीस तपास करत असताना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास संशयित सूर्यकांत हा खेड एसटी स्थानकावर फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. या ठिकाणी त्याची कसून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी त्याला पहाटे सुकीवली चव्हाणवाडी येथे नेल्यावर त्याने तिचा मृतदेह ज्या शौचालयाच्या टाकीत टाकला होता ती टाकी दाखवली. पोलिसांनी पंचाच्या समक्ष टाकीचे झाकण उघडल्यानंतर टाकीत श्रुतीचा मृतदेह आढळून आला. टाकीतून मृतदेह बाहेर काढताच तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.