अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : देशाचे माजी गृहमंत्री आणि लातूरचे खासदार राहिलेले माजी शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांनी गुरुवारी दिल्लीत (Delhi) वादग्रस्त वक्तव्य केलं. या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोवर एका आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'तर तलवारीनं हात छाटल्याशिवाय राहणार नाही', थेट अशा शब्दातच या आमदाराने इशारा दिलाय. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. (mla devendra bhurar controvercial statement at warud amravati ncp followers program)
" मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आहे आणि उद्याही राहिल. तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत आहे. आमच्या नादी लागू नका. तुम्ही निवडणुकीत जाणीवपूर्वक धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्नही केलात, तर तलवारीनं हात छाटल्याशिवाय राहणार नाही", असा इशाराच अपक्ष आमदार देंवेंद्र भुयार यांनी दिला. ते अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
दरम्यान भुयार यांच्या वादग्रस्त वक्तव्यासह त्यांच्या उपरण्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कार्यकर्तांच्या मेळाव्यात भुयार यांनी राष्ट्रवादीचं उपरणं घातलं होतं. त्यामुळे या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे, आमदार निलेश लंके उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र भुयार यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उपरणं गळ्यात टाकून भाषण केलं. त्यामुळे देवेंद्र भुयार यांचा राष्ट्रवादी प्रवेश आज जरी निश्चित नसला तरी येत्या काळात राष्ट्रवादीचं घड्याळ हाताला बांधण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.