Crime News In Marathi: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका इमारतीत वॉचमनचं काम करणाऱ्या व्यक्तीच्या 3 वर्षांच्या मुलीवर 18 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापनजक घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, एका व्यक्तीमुळं हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली असून न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीत एक व्यक्ती वॉचमन म्हणून काम करतो. इमारतीच्याच आवारात एका खोलीत तो कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी २ नोव्हेंबर रोजी हा वॉचमन इमारतीची साफसफाई करण्यासाठी बाहेर पडला होता. त्याचवेळी इमारतीतील एका रहिवाशाने वॉचमनच्या खोलीतून त्याच्या लहान मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्याने खोलीत जाऊन पाहिलं असता, एक युवक तिथून पळताना दिसला.
रहिवाशाने वॉचमनला त्याची माहिती दिली. नंतर वॉचमन आणि त्याच्या पत्नीने घरी धाव घेत मुलीची विचारपूस केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचं त्यांना आढळलं. यानंतर त्यांनी चिमुकलीला घेऊन शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं.
मध्यवर्ती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपासाची चक्रं फिरवली आणि अवघ्या २ तासातच १८ वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केलं असता. न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर उल्हासनगरात घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरून गेलं आहे