देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : पनवेलमध्ये घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली दिसून येत आहे. मनसेतर्फे बांगलादेशींना खळ खट्याकचा इशारा देण्यात आला आहे. 'बांगलादेशीनो चालते व्हा', असे सांगणारे पोस्टर पनवेलमध्ये पाहायला मिळत आहेत. 9 फेब्रुवारीला बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा आझाद मैदान इथे मोर्चा होणार आहे. या पार्श्वभुमीवर पनवेल परिसरात मनसेने बांगलादेशींना जाहीर आव्हान दिले आहे.
बनावट डॉक्युमेंट बनवून पनवेल आणि परिसरात बांगलादेशी राहत आहेत हे वारंवार समोर आले आहे. एका मराठी कुटूंबाला फसवून बांगलादेशी चक्क त्या कुटूंबात जावई झाला. मनसे हे कदापी सहन करणार नसल्याचे मनसे पदाधिकारी महेश जाधव यांनी सांगितले. तसेच पोलीस आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने पडताळणी करावी आणि या बांगलादेशींची हकालपट्टी करावी नाहीतर आम्हाला खळ खट्याक शिवाय पर्याय नसल्याचेही जाधव म्हणाले.
नवी मुंबई,पनवेल परिसरात स्वस्तात मजूर मिळतायत म्हणून अनेक ठेकेदार या बांगलादेशींची राहण्याची सोय करतात. त्यांना आश्रय देतातय. हे आमच्या लक्षात आल आहे. आमचा त्या ठेकेदारांना आणि जो कोणी बांगलादेशिना आश्रय देतोय त्या सगळ्यांना इशारा आहे तात्काळ हे थांबवा नाहीतर आम्ही आमच्या स्टाइलने धडा शिकवू असा इशारा मनसे पदाधिकारी सुधीर नवले यांनी दिला आहे.