मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद : राज्यात कोरोनामुळे (CoronaVirus) लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या दरम्यान, अनेकांना भरमसाठी वीज बिले (Electricity bill) आलीत. राज्य सरकारकडून बिलाबाबत सूट मिळेल असे आधी जाहीर केले होते. मात्र, अनलॉक सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने हात वर केलेत. तुम्हाला आलेली वीज बिले भरावी लागतील, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सामान्य वीज ग्राहक हवालदिल झाला आहे. या वीज प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. वीज बिलात सूट देण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे. यासाठी आज मनसेने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाही. असे असताना मनसे मोर्चावर ठाम आहे.
औरंगाबाद येथे मनसेच्या मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांना १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. तरीही सरकार विरोधात मनसेचा हा मोर्चा निघणारच, असा इशारा मनसेने दिला आहे. वाढीव वीज बिल मुद्द्यावर मनसेचा आज राज्य भरात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.
मुंबईत वांद्रे इथे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा धडकणार आहे. मनसेचे नेते,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार ११ वाजता मोर्चा काढला जाणार आहे. अनेक ठिकाणी मनसेला मोर्चा काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
पुण्यात मनसेचा आज बिल माफीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांकडून थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे. शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे. मनसे मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. मात्र, कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र मोर्चासाठी आग्रही दिसून येत आहे