मुंबई : गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं मनसेचे कार्यकर्तेही सज्ज झालेत आणि शिवाजी पार्कही....मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्यावर्षी पक्षाच्या नव्याने सुरू झालेल्या या परंपरेत खंड पडला होता...पण आता सर्व काही ठीक आहे...आणि पक्षही नवी उभारी घ्यायच्या तयारीत आहे...गुढीपाडव्याला सायंकाळी सर्वांचेच लक्ष असेल ते राज ठाकरे यांच्या भाषणाकडे..
एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहाते असलेल्या राज ठाकरेंचा आज त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडालाय. मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर जाहीर भाषण असो वा व्यंगचित्रे ठाकरी फटकारे सुरूच आहेत. देशात मोदी लोकप्रियतेची लाट ओसरल्याचा दावा त्यांचे राजकीय विरोधक करीत आहेत...
भाजपच्या विजयाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधी राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु झालाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतलाय.
राज्यातही तो प्रयत्न होण्याची शक्यता आहे. या मोटेत राज ठाकरेही असावेत अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
शरद पवार आणि राज ठाकरे यांचे अलीकडे सूर जुळू
लागल्याचं स्पष्ट झालंय...
पराभव झाला तरी राज ठाकरे यांची अजून टिकून असलेली लोकप्रियता त्यासाठी कारणीभूत ठरलीय...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही अधेमधे भेटून पवार राजकारणात काही नवा प्रयोग करू पाहताहेत...
लोकसभा निवडणुकीबरोबर राज्यात विधानसभा निवडणूकही होणार की काय असाही एक अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत
या घडामोडींचा फायदा उचलण्याची राज ठाकरेंचीही मनीषा आहे...त्यामुळेच की काय गुढीपाडवा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी शरद पवारांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. आपल्या गुढीपाडवा मेळाव्या भोवतालचे गूढ गडद केलंय... या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं असलं, तरी त्यावर यामितीला विश्वास ठेवणार तरी कोण आणि कसा ?
प्रकट मुलाखतीदरम्यान राज आणि पवारांच्या देहबोलीतील सहजता अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलीय. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकरणात काका-पुतण्याचं नवं समीकरण अस्तित्वात आलं तर त्याचं आश्चर्य वाटायला नको...