Uddhav Thackeray Takes Dig At Home Minister Amit Shah: भारत आणि कॅनडामधील राजकीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. कॅनडामधील काही जणांच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप तेथील सरकारने केला असून यामध्ये थेट भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नावाचा उल्लेख कॅनडाकडून करण्यात आला आहे. भारत आणि कॅनडामधील हे संबंध ताणले गेलेले असतानाच दुसरीकडे कॅनडामधील हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले झाल्याने प्रकरण अधिक चिघळलं आहे. मात्र या प्रकरणावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खोचक शब्दांमध्ये अमित शाहांवर निशाणा साधताना त्यांची बाजू घेतल्याचं दिसत आहे.
तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराच्या मदतीने भारत सरकारने कॅनडातील काही शीख नागरिकांच्या हत्या केल्या. हे शीख कॅनडाचे नागरिक होते, असा कॅनडाने आरोप केला आहे. मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत. असं असतानाच आता 'सामना'मधून अमित शाहांची बाजू घेत ते असं काही करतील असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे. मात्र ही अशी बाजू घेताना खोचक शब्दांमध्ये 'सामना'मधून अमित शाहांच्या काम करण्याच्या पद्धतीवरच टीकास्र सोडण्यात आलं आहे. ‘भारताच्या माहितीनुसार मारलेले गेलेले हे शीख नेते भले कॅनडाचे नागरिक असतील, पण कॅनडात बसून ते भारतातील मेलेल्या खलिस्तानी चळवळीस खतपाणी घालत आहेत. त्यामुळे त्यांचा निपटारा भारताने कॅनडाच्याच भूमीवर केला व त्यामागे गृहमंत्री अमित शहा आहेत’, असा आरोप कॅनडा सरकारने केला आहे. आता यावर किती विश्वास ठेवायचा?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
"कॅनडाच्या भूमीवरील भारताच्या शत्रूंचा खात्मा अमित शहा करू शकत असतील तर मागच्या 11 वर्षांत हे आपले गृहमंत्री पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊद इब्राहिम, शकील, टायगर मेमनसारख्यांचा बालही वाकडा का करू शकले नाहीत? कॅनडा फार लांब आहे. उलट पाकिस्तान तर भारताच्या बगलेत आहे. त्यामुळे कॅनडात जाऊन अमित शहांनी भारत हिताच्या मारामाऱ्या केल्या या अफवेवर आमचा विश्वास नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लागवला आहे.
नक्की वाचा >> योगींना कॅनडात पाठवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मोदींकडे मागणी! म्हणाले, '‘बटेंगे तो कटेंगे’ हा संजीवनी...'
"खुद्द आपल्या भारत देशात कश्मिरी पंडितांची घर वापसी मोदी-शहा करू शकलेले नाहीत. कश्मीरच्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यात हिंदू समाजाचे शिरकाण सुरू आहे. मणिपुरातही हिंदूच मारला जात आहे व भाजपवाले पश्चिम बंगालात जाऊन ममतांविरोधात ‘हिंदू खतरे में’च्या गर्जना करीत आहेत. हे निव्वळ ढोंगच म्हणावे लागेल. काँग्रेस राजवटीत ‘इस्लाम खतरे में’च्या घोषणा होत असत. आता मोदी काळात ‘हिंदू खतरे में’ असे नारे लागत असतील तर मोदी व त्यांच्या लोकांना हिंदू हितरक्षक कसे म्हणायचे?" असा प्रश्न ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.