'बंद पडलेल्या दगड खाणीत..' पालघर शिवसेना नेता अपहरणात गुजरात कनेक्शन आलं समोर

Ashok Dhodi Kidnapping Case: अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात आता पोलीस चौकशीला वेग आला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 31, 2025, 06:54 PM IST
'बंद पडलेल्या दगड खाणीत..' पालघर शिवसेना नेता अपहरणात गुजरात कनेक्शन आलं समोर title=
अशोक धोडी अपहरण

Ashok Dhodi Kidnapping Case: एकीकडे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या आणि अपरहणाचं प्रकरण देशभरात गाजत असताना दुसरीकडे पालघरमधून शिवसेनेचे नेते बेपत्ता झाल्यानं खळबळ उडालीय.  गेल्या 9 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पालघरचे शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता आहेत. त्यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त केला जातोय. अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात आता पोलीस चौकशीला वेग आला आहे. अशातच चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान आता मोठी अपडेट समोर आली आहे.

गुजरातमध्ये सापडली कार 

पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. 20 जानेवारीला संध्याकाळी त्यांची लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेनं गेली असल्याचा सीसीटीव्ही समोर आला. त्यामुळे अशोक धोडी बेपत्ता झाले नसून त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप आता कुटुंबियांनी केलाय. तसेच संशयित आरोपींची नावंही कुटुंबियांनी पोलिसांना दिलीय. अशोक धोडी यांची कार गुजरातमध्ये सापडली आहे. भिलाडजवळील सरिग्राम मालाफलिया इथे एका बंद दगड खाणीत त्यांची गाडी सापडली. घटनास्थळी तातडीनं पालघर पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलही स्वतः घटनास्थळी पोहोचले आहेत. 

संशयित आरोपी फरार

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी वेवजी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अविनाश धोडी यांनीच अशोक धोडी यांच अपहरण केल्याचा अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. घोलवड पोलीस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीवर चौकशीसाठी आलेला संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाशचा शोध सुरू आहे.

सीसीटीव्ही तपास सुरु

अशोक धोडीच्या शोधासाठी पोलिसांनी काही पथकं स्थापन केलीय. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात येतोय. पोलिसांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यातील वाई बोरीगाव परिसरातील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतले.