safety tips to protect house: चोरी ही आजकाल सर्वात मोठी समस्या असते. चोर काही मिनिटांतच तुमच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारू शकतात. अनेकदा चोरी घडण्यामागे आपल्याच काही चुका कारणीभूत असतात. काही साध्या सवयी लावल्या तर घरात होणाऱ्या चोऱ्या टाळता येतात. किंवा चोरी होण्याचा धोका बराच कमी होऊ शकतो. त्यामुळे, घराबाहेर जाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.
आजच्या काळात सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे, पण त्याचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. घराबाहेर जाताना किंवा सहलीसाठी काही दिवसांसाठी बाहेर गेल्यावर आपल्या लोकेशनबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका. चोर हे सध्या खूप हुशार झाले आहेत. जर त्यांना खात्री झाली की तुम्ही संपूर्ण कुटुंबासह बाहेर गेला आहात, तर ते तुमच्या घरावर डोळा ठेवू शकतात. त्यामुळे, तुमच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखा.
काही लोक घरातील मौल्यवान वस्तू ठेवलेले कपाट किंवा तिजोरी खिडकीच्या अगदी जवळ ठेवतात. रात्री जेव्हा दिवे लावले जातात, तेव्हा बाहेरून घरात काय आहे, हे सहज दिसू शकते. यामुळे चोरांना अंदाज लावता येतो की, घरात मौल्यवान वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत. त्यामुळे, अशा गोष्टी खिडकीजवळ ठेवू नयेत.
जर घरातील तिजोरी किंवा कपाटाचे कुलूप खराब झाले असेल आणि तुम्ही दुरुस्तीसाठी एखाद्या मेकॅनिकला बोलावले असेल, तर त्याच्या समोर जास्त मौल्यवान वस्तू उघड करू नका. जर तुम्ही त्याच्यासमोर रोख पैसे, दागिने किंवा अन्य महागड्या वस्तू ठेवत असाल, तर त्याला चोरी करण्याची संधी मिळू शकते. अशा गोष्टी सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि गरज नसताना अनोळखी लोकांसमोर उघड करू नका.
घराच्या बाहेर रात्री अंधार असेल तर चोरांसाठी ते एक सोपी संधी ठरू शकते. त्यामुळे, बाहेर जाताना घराच्या प्रवेशद्वाराजवळ लाइट सुरू ठेवा. हल्ली स्मार्ट लाइट्सदेखील उपलब्ध आहेत, ज्या ठराविक वेळाने चालू-बंद होतात. यामुळे घरात कुणी तरी आहे, असे भासवता येते आणि चोरांना घर रिकामे असल्याचा अंदाज येत नाही.
याशिवाय, घराच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाचे उपाय करता येतील
CCTV कॅमेरे बसवा: घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि मागच्या बाजूला CCTV कॅमेरे लावा.
सुरक्षा ग्रील लावा: खिडक्या आणि बाल्कनीला मजबूत ग्रील बसवा, जेणेकरून चोरांना घरात प्रवेश करणे अवघड जाईल.
सुरक्षा अलार्म सिस्टम वापरा: जर कोणी जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर अलार्म वाजेल, ज्यामुळे चोर पकडले जाण्याची शक्यता वाढते.
शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा: जर तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर जात असाल तर शेजाऱ्यांना कल्पना द्या. त्यामुळे, ते तुमच्या घरावर लक्ष ठेवू शकतील.
घरातील सुरक्षा ही तुमच्या हातात आहे. काही साध्या गोष्टींची काळजी घेतली तर घरात चोरी होण्याचा धोका बराच कमी करता येतो. सुरक्षिततेसाठी काळजी घेत राहा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)