केरळच्या कोची येथे एका आघाडीच्या खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने 15 जानेवारीला टोकाचं पाऊल उचललं. शाळेत वारंवार होणारी रँगिंग आणि धमक्या यांना कंटाळून त्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. वारंवार होणाऱ्या अपमानाला कंटाळलेल्या विद्यार्थ्याने घरी आल्यावर आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येमुळे त्याची आई उद्ध्वस्त झाली असून, मुलाला टॉयलेट सीट चाटायला लावली, तसंच फ्लश केल्यानंतर त्याचं डोकं टॉयलेटमध्ये बुडवलं असे आरोप केले आहेत.
आईची न्याय देण्याची मागणी
मुलाच्या आईने थ्रिपुनिथुरा येथील हिल पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली आहे. बाल आयोगाकडेही त्यांनी एक याचिका देखील सादर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मुलाने सहन केलेल्या छळाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. या याचिकेत त्याच्या मागील शाळेच्या उपप्राचार्यांकडून गैरवर्तन केल्याचे आरोप आहेत.
मुलाच्या आईने फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "मी एक दुःखी आई आहे जी माझ्या मुलासाठी न्यायासाठी लढत आहे, जो एक आनंदी, सक्रिय आणि प्रेमळ मुलगा होता. त्या दुर्दैवी दिवशी, माझा मुलगा दुपारी 2.45 वाजता शाळेतून घरी परतला आणि 3.50 वाजता, माझे जग उद्ध्वस्त झाले..."
आपल्या मुलाने टोकाचं पाऊल का उचललं हे समजून घेण्यासाठी आई आणि कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या मित्रांशी संवाद साधला, तसंच सोशल मीडियाची तपासणी केली. यानंतर त्यांना जे आढळलं त्यावरून त्याने सहन केलेल्या अत्याचाराचे हृदयद्रावक चित्र समोर आलं. आईचा दावा आहे की तिच्या मुलाला शारीरिकरित्या मारहाण करण्यात आली. त्याच्या रंगावरुन त्याला हिणवण्यात आलं. शिवीगाळ करण्यात आली आणि अकल्पनीय अपमान सहन करावा लागला. ज्यामध्ये जबरदस्तीने वॉशरूममध्ये नेण्यात आले, टॉयलेट सीट चाटण्यास भाग पाडण्यात आले आणि त्याचे डोके फ्लशिंग टॉयलेटमध्ये ढकलण्यात आले.
मुलाच्या आईने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या मृत्यूनंतर काही विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन केलं. मुलाच्या मृत्यूनंतर, मित्रांनी न्यायाची मागणी करणारे एक इन्स्टाग्राम पेज सुरु केलं होतं. परंतु शाळेने दबाव आणल्यानंतर ते पेज काढून टाकण्यात आले. शाळा प्रशासन सत्य दाबण्याचा प्रयत्न करत असून हे प्रकरण पोलिसांकडे सोपवलं असल्याचं फक्त सांगत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
"त्याच्या मृत्यूनंतरही त्यांनी क्रूरता थांबवली नाही," असं दुःख मुलाच्या आईने व्यक्त केलं आहे. "जेव्हा मी शाळेच्या अधिकाऱ्यांकडे पुरावे घेऊन जबाबदारीची मागणी केली तेव्हा त्यांनी मला फक्त एवढेच सांगितले की माहिती पोलिसांना पाठवण्यात आली आहे. शाळेची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते या घटनांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत असे मला ठामपणे वाटते," असाही आरोप त्यांनी केला आहे.
भावनिक आवाहन करताना त्यांनी म्हटलं आहे की, "मी माझ्या मुलासाठी न्याय मागत आहे. त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये. या क्रूर कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना कायद्याच्या पूर्ण ताकदीला सामोरे जावे लागेल आणि माझ्या मुलासारखे इतर कोणत्याही मुलाला त्रास होऊ नये यासाठी पद्धतशीर बदल केले पाहिजेत."
त्यांनी आपला कायद्यावर विश्वास असल्याचंही म्हटलं आहे. "मी जनतेला न्यायासाठीच्या या लढाईला पाठिंबा देण्याचे आवाहन करते. फक्त माझ्या मुलासाठीच नाही तर शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी सुरक्षित आणि आधार देणारे वातावरण निर्माण व्हावे असं वाटणाऱ्या प्रत्येक मुलासाठी."