Badlapur Crime: बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात वेगळंच वळण आलंय. ही केस यापुढे लढायची नाही म्हणत अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी यातून अचानक माघार घेतली. या प्रकरणात 55 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रथमदर्शनी दोषी ठरवलं होतं. त्या दोषी अधिका-यांवर कारवाई का केली नाही, अशा शब्दात कोर्टानं खडसावलंय. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊया.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. आम्हाला केस लढायची नाही म्हणत अक्षय शिंदेंच्या कुटुंबीयांनी अचानक माघार घेतलीय. पुढे लढायचं नाही, ते बंद करा अशी मागणी आरोपी अक्षय शिंदे याच्या आईवडिलांची उच्च न्यायालयात केलीय. आमच्यावर कुणाचाही दबाव नसल्याचं शिंदेच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलंय. दोषी पोलीस अधिका-यांवरील कारवाईसंदर्भात कोर्टात सुनावणी सुरू होती. मात्र या सुनावणीदरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी केस मागे घेण्याची इच्छा व्यक्त केलीये.
आमचा मुलगा गेला, लोकांनी आम्हाला खूप टॉर्चर केलंय. आम्हाला धावपळ होणार नाही, त्यामुळं आम्हाला ही केस लढायची नाही असं वक्तव्य अक्षयच्या आई-वडिलांनी हायकोर्टासमोर केलंय. कोर्ट याबाबत उद्या निर्णय देणार आहे.
आम्हाला ताण आणि धावपळ सहन होत नाही.सुनेला बाळ झालंय आणि ती एकटी राहते. सुनेकडं राहायला जाणार आहोत.अक्षयचं एन्काऊंटर प्रकरण पुढे लढायचं नाही. हा खटला बंद करण्यात यावा
असं त्याच्या आईवडिलांनी म्हटलंय.
बदलापूरमधल्या शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचं कथित एन्काऊंटर करण्यात आलं होतं. त्याविरोधात त्याच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचं एन्काऊंटर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता या केसमधूनच अक्षय शिंदेच्या कुटुंबानं माघार घेतल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्यात.