Crime News: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील बुद्धि विहार कॉलनीत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका चार वर्षाच्या मुलीने आपल्या आजीला व्हिडीओ कॉल करुन आईचा घऱात लटकलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह दाखवला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. यावेळी तिने आजीला पप्पांनी आईला लटकवलं आहे. आई आता काहीच बोलत नाही आहे असंही सांगितलं.
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि गाजियाबादमध्ये पोहोचले. हत्या करुन मृतदेह लटकवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे.
गाझियाबादमधील मुरादनगर येथील जलालपूर येथील रहिवासी रुबी राणी (35) हिचा विवाह 2019 मध्ये गाझियाबादमधील मोदीनगर येथील रहिवासी रोहित कुमारशी झाला होता. रुबी कुंडरकी ब्लॉकमधील भेकनपूर कुलवारा येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्त होती. रोहित एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो घरून ऑफिसचे काम करायचा. रुबी तिच्या पती आणि चार वर्षांची मुलगी ओजस्वीसोबत बुद्धि विहारमध्ये भाड्याच्या घरात राहत होती.
महिलेच्या माहेरच्यांनी सांगितल्यानुसार, बुधवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ओजस्वीने आपल्या आजीला व्हिडीओ कॉल केला. तिने आजीला सांगितलं की, आई लटकलेल्या अवस्थेत आहे. ती माझ्याशी बोलत नाही आहे. रुबीच्या कुटुंबीयांना मृतदेह पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी माजोला पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. नंतर, तेदेखील मुरादाबादला आले. महिलेच्या कुटुंबाचा आरोप आहे की रोहित दररोज रुबीला मारहाण करायचा. खून केल्यानंतर त्याने मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसंच रोहितला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. शवविच्छेदन अहवालातून जे सत्य समोर येईल त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
पोलीस चौकशीत महिलेच्या पालकांनी सांगितलं की, रुबी आणि रोहितचे मोदीनगरमध्ये घर आहे. आधी दोघेही या घराचे हप्ते भरत होते पण रोहितने हप्ते भरणे बंद केले. यानंतर, हप्ते जमा करणारी रूबी ही एकमेव होती. याशिवाय, रोहित रूबीवर तिच्या पालकांकडून पैसे आणण्यासाठी दबाव आणत असे. तिच्या पालकांनीही 15 हजार रुपये दिले होते. यानंतरही रोहितने रुबीला त्रास देणे थांबवले नाही. तो त्याला विविध प्रकारे छळत असे.
पोलीस तपासादरम्यान आणि मुलीच्या पालकांच्या चौकशीदरम्यान असे आढळून आले की बुधवारीही रोहितने रुबीच्या खात्यातून 50 हजार रुपये UPI द्वारे त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.