Vicky Kaushals Grishneshwar Temple Visit: बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचा आगामी ऐतिहासिक चित्रपट 'छावा' 14 फेब्रुवारी 2025 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी विक्की कौशलने औरंगाबादच्या ग्रीष्णेश्वर मंदिरात जाऊन महादेवाची पूजा केली आणि चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली.
'छावा' हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 1681 मध्ये झालेल्या त्याच्या राज्याभिषेकापासून सुरू होतो आणि त्यांच्या शौर्य आणि कारकिर्दीवर प्रकाश टाकतो. या चित्रपटात विक्की कौशलसोबत अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि नील भूपालम यांसारखे मोठमोठे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय खन्ना 'औरंगजेब', आशुतोष राणा 'सरसेनापती हंबीरराव मोहिते', तर दिव्या दत्ता 'सोयराबाईं' यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अभिनेता विक्की कौशलने 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी औरंगाबादच्या ग्रीष्णेश्वर मंदिरात जाऊन महादेवाची पूजा केली. ही पुजाविधी करताना तो भक्तीभावामध्ये अगदी लीन दिसत आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विक्की भटजींच्या मार्गदर्शनाखाली पुजाअर्चा करताना दिसत आहे. यावेळी विक्कीने पिवळ्या रंगाचा पटका अंगावर घेतला असून कपाळावर टीळदेखील लावले आहे. विक्की कौशलचा हा लूक चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. आता या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
विक्कीने जयपूरमध्ये प्रमोशनदरम्यान सांगितले की, 'ऐतिहासिक चित्रपटांसाठी फक्त अभिनेत्याची नव्हे, तर संपूर्ण टीमची खूप मेहनत लागते. असे चित्रपट मोठ्या प्रमाणावर बजेटसह तयार करावे लागतात आणि भूतकाळातील काळाला पडद्यावर सजीव करावे लागते.' यासाठी विक्कीने खास ऐतिहासिक संशोधन, अॅक्शन ट्रेनिंग आणि बॉडीबिल्डिंग यासारखी तयारी केली.
'छावा दिवस' नावाचा एक दिवस साजरा करणार असल्याचे विक्कीने जाहीर केले. 'छावा दिवस' आणि चित्रपटाचे पुढील प्रमोशन अतिशय धुमाकुळ घालणारे असतील. 14 फेब्रुवारीनंतर तो 'महावतार' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो प्राचीन योद्धा ऋषी परशुराम यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या वर्षी क्रिसमस 2026 मध्ये प्रदर्शित होईल.