दादा आणि भुजबळाचं पॅचअप? भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन

छगन भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन. आता भुजबळांची नाराजी दूर होणार का? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 6, 2025, 10:05 PM IST
दादा आणि भुजबळाचं पॅचअप? भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन  title=

नाराजीनंतर राष्ट्रवादीपासून अंतर ठेवलेले छगन भुजबळ गेल्या काही दिवसांत भाजपच्या जवळ जात असल्याचं दिसतय. मात्र अजित पवार यांचा छगन भुजबळ यांना दिलगीरीचा फोन गेला आणि अजितदादा - छगन भुजबळ यांच्या पॅचअपच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. 

दादा आणि भुजबळाचं पॅचअप?

मंत्रिंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ यांनी त्यांची नाराजी जाहीररित्या व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांची अशी नाराजी नंतर अनेकदा व्यक्त होतच राहिली. पण त्याचगतीनं भाजपबरोबर त्यांची जवळीक वाढल्याचं अनेकदा दिसलं. दोनच दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर पुन्हा भेट घेतली. तर तिकडे नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांच्या होर्डिंगवर अजित पवार आणि घडाळ्याच्या चिन्हाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र  फडणवीस यांचे फोटो लावलेले दिसले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि छगन भुजबळ यांच्यामधील अंतर आणखी वाढल्याच्या चर्चा पुन्हा सोशल मीडियावर जोर धरु लागल्या.

भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन

आतापर्यंत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामार्फतच छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला जात होता. अनेक वेळा छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर बोलण्यास टाळाटाळ केली होती. शिर्डीतल्या राज्यव्यापी शिबीरातही काही तासांसाठी हजेरी लावत छगन भुजबळ यांनी आपण नाराज असल्याचे पुन्हा संकेत दिले. पण आता चार दिवसांपूर्वी अजित पवार यांचा दिलगिरी व्यक्त करत फोन आल्याच छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या पॅचअपची चर्चा सुरु झाली. 

अजित पवार यांच्या या दिलगीरीच्या फोननंतर आता छगन भुजबळ यांची नाराजी दूर होते का, आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीत सक्रीय होतात का याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात असेल.