मालेगाव : चोरीच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बेकायदेशीरपणे बदलून विक्री करणाऱ्या दोघा जणांना मालेगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २११ चोरीचे मोबाईल तसेच आयएमईआय क्रमांक बदलण्याचे साहित्य आणि संगणक जप्त करण्यात आले आहे. मालेगाव परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे समोर आले होते. मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलण्यात येत असल्याने मोबाईल चोराचा शोध घेण्यात पोलिसांपुढे अडचणी निर्माण होत होत्या. अखेर पोलिसांनी दोघांना अटक केले. त्यामुळे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
मालेगाव सरदार मार्केट भागातून रईस शहा, अब्बास शाह यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे बेकायदेशीरपणे आयएमईआय क्रमांक बदललेले चार अँड्रॉइड मोबाईल आढळून आले. पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच त्यांनी चंदनपुरी गेट भागात एका मोहम्मद मोबाईल शॉपी या दुकानातून मोबाईलचा लॉक तोडून आयएमईआय क्रमांक बदलून दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी तात्काळ छापा मारून आयएमईआय बदलण्यासाठी आलेले सुमारे २२१ मोबाईल तसेच संगणक आणि आयएमईआय बदलण्याचे साहित्य ताब्यात घेतले.
मोबाईल शॉपीचा मालक इजाज अहमद वल्द मोहम्मद यास ताब्यात घेतले आहे. दोघा संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी माहिती दिली.