मुंबई : Monsoon Update : Heavy Rain in Maharashtra :आता बातमी पावसाची. येत्या 5 दिवसांत राज्यात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाचीही शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय आहे.
मान्सूनने आता विदर्भाकडे वाटचाल सुरु केलीय. येत्या दोन दिवसांत मान्सून विदर्भात दाखल होण्याचा अंदाज आहे. विदर्भाच्या काही भागात सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरु आहेत. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
कोकणात मात्र आता मान्सूनचा पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. मान्सूनने सोमवारी मध्य महाराष्ट्राचा जवळपास सर्व भाग व्यापून मराठवाडय़ाच्या बहुतांश भागांत प्रवेश केला होता. सध्या मोसमी पावसाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मान्सूनच्या वाऱ्यांची प्रगती चांगली असली तरी दाखल झालेल्या भागात पावसाचं प्रमाण कमी आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये काल संध्याकाळी आणि रात्री तुफान पाऊस बरसला. काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं. संध्याकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. पहिल्याच पावसात केज शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं होतं. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.