मुंबई : अंदमानहून निघालेला मान्सून आता केरळच्या दिशेने पोहोचणार आहे. देशात पुढच्या तीन दिवसांमध्ये दाखल होणार आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते.
मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्वेकडील भागात पोहोचला असल्याचं समोर आलं होतं. सद्यस्थितीत मान्सून मालदीव आणि कोमोरिन भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची हीच गती कायम राहिल्यास केरळात सोमवारी म्हणजेच 31 मे रोजी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
सध्या केरळच्या किनारपट्टीपासून अंदाजे 200 किलोमीटर अंतरावर मान्सून असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तौक्ते आणि त्यांनंतर आलेल्या यास चक्रीवादळामुलं केरळमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी झालं होतं. पण या चक्रीवादळांमुळं मान्सून दोन तीन दिवस आणखी आधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण आता मान्सून 31 मे किंवा 1 जून दरम्यानच दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनचा वेग दरवर्षीप्रमाणेच सामान्य आहे. त्यामुळं सद्या तो केरळच्या दिशेनं प्रवास करत आहे. गुरुवारी मालदीव ओलांडून मान्सून पुढं सरकला आहे. त्यामुळं लवकरच आता देशात मान्सूनच्या सरी बरसतील. राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. काही ठिकाणी घरांचे पत्रे , झाडांची पडझड झाली आहे. 1 जूनपर्यंत अनेक भागात वळवाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.