MPSC Recruitment: शिंदे सरकारने (Maharashtra Government) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून मेगाभरती जाहीर केली आहे. यासंबंधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ अंतर्गत राज्य शासनाच्या विविध विभागांमधील वेगवेगळ्या संवर्गाच्या एकूण ६७३ पदांच्या भरतीकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर ही जाहिरात तुम्ही पाहू शकता. याशिवाय ट्वीटही केली आहे.
राज्य शासनाच्या पाच विभागात ही भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग. पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व नागरी विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी २२ मार्च पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/1nVjZPHVq7
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 24, 2023
सामान्य प्रशासन विभागामध्ये 295, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात 130, सार्वजनिक बांधकाम विभागात 15, अन्न व नागरी विभागात 39, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात 194 पदं भरली जाणार आहेत. या सर्वांना गट-अ आणि गट-ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार वेतन दिलं जाणार आहे.
या भरतीची पूर्व परीक्षा ४ जून रोजी राज्यातील एकूण३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल अशी माहिती राज्य लोकसेवा आयोगाने दिली आहे.
संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब आणि विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबरला होईल. निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबरला पार पडेल. अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबरला होणार आहे.